वकील गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी
वकील गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी..
मुंबई, दि. ९ एप्रिल:
एस. टी. कामगारांच्या संपाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काही लोकांनी हल्ला करत एसटी कामागारांच्या प्रश्नाला पवारच जबाबदार असल्याचा दोष हे लोक देत होते. याप्रकरणी सदावर्ते यांना रात्री अटक करण्यात आली होती. आज किला कोर्टाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आझाद मैदानात पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कामगारांच्या संपावर उच्च न्यायालयाने निकाल देऊन कामगारांना कामावर रुजू राहण्याचे निर्देश दिले होते. या निकालानंतर दुसऱ्या दिवशी खासदार शरद पवार यांच्या घरावर काही लोक चाल करुन गेले व घरावर हल्ला केला. चपला फेकल्या, दगडफेक केली. याप्रकरणी सदावर्ते यांना अटक केली होती. सदावर्ते यांनी प्रक्षोभक विधाने केली होती त्यांनीच या लोकांना चिथावणी दिल्याचे तक्रार करत पोलिसांनी अटक करुन किला कोर्टात हजर केले. पोलिसांनी सदावर्ते यांची १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती पण दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. सदावर्ते यांच्यासोबतच पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या १०९ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
