पोलीसांच्या सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी देणार
पोलीसांच्या सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी देणार..
शिर्डी, दि. ६ एप्रिल :
पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले.
शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अमंलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलीसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिली आहेत. या निधीत जूलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल. असा शब्द मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देतो. पोलीसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही.
पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलीसा़नी करू नये. असे ही उपमुख्यमंत्री पवार या़नी सांगितले.
गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनी ही एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. गुन्हे कमी झाल्यास राज्याचे उत्पन्न वाढते. जिल्हा नियोजन मधून पोलीसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील.
शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यातून कॉर्गा टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील. यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे.
