धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई लढायची आहे.
धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई लढायची आहे.
सांगली दि. २ एप्रिल :
भाजपशासित कर्नाटक राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या दुकानातून मालाची खरेदी करू नका, अशा प्रकारचा फतवा काही संघटनानी काढला. राज्य हातामध्ये असलेले घटक जर असे करू लागले, तर देश पुढे कसा जाईल? सामाजिक आणि राजकीय ऐक्य कसं ठेवायचं हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे.आज या धर्मांध वृत्तीच्या विरोधात सुध्दा एकप्रकारची लढाई आपल्याला लढायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शरद पवार सांगली – शिराळा येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
शरद पवार पुढे म्हणाले की, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिपण्णी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवाने देशात बघायला मिळतंय. त्याचा परिणाम लोकांमध्येही एकप्रकारची अस्वस्थता आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद ही त्या काळातील नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्य उभे करण्यासाठी कष्ट केले आणि नंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले.
आज देशाचं राजकारण एका वेगळ्या दिशेला जातंय आणि राज्य वेगळ्या विचारांच्या लोकांच्या हातात आहे. हा शिराळा तालुका आणि या सांगली – सातारा जिल्ह्यामधून कर्तृत्ववान नेतृत्वाची मालिका होऊन गेली. ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू व अशी अनेक नावं आहेत. अशी अनेक कर्तृत्ववान माणसे तयार झाली त्यांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील यादृष्टीने काम केले. या नेत्यांनी विकासाचं व माणसं जोडण्याचं राजकारण केलं. आज मात्र देशामध्ये धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले जात आहे.
गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्रासुध्दा गेल्या दोन वर्षांत एका वेगळ्या विचाराचे राज्य आलं. जे पूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. देशाला हेच चित्र दिसलं या सगळ्या कालखंडात सामाजिक ऐक्य या गोष्टी संबंधी वेगळी भूमिका मांडली गेली असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
<span;>महाराष्ट्राची गुढी जी राष्ट्रवादीच्या माध्यमातून उभी केलीयं, ती भक्कम आणि शक्तीशाली कशी राहील आणि त्यासाठी हातभार लावणाऱ्यांचे स्वागत करण्याच्या हेतूने आज आपण या ठिकाणी जमलो आहोत.
शिराळा या मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर योग्य असेल त्यासाठी पडेल ती भूमिका घेणारा असा इतिहास या मतदारसंघाचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा – सांगली जिल्हा एक असताना विशेषत: या शिराळा तालुक्याचे एक आगळंवेगळं योगदान आहे. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य इतिहासामध्ये या भागातील स्वांतत्र्यसैनिकांचे योगदान खूप मोठे आहे. याच भागातून कर्तृत्ववान नेत्यांनी राज्याच्या, जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या हितासाठी काही निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत असेही शरद पवार म्हणाले.
