Ads

-

महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकावणे माजी मंत्री लोणीकरांना भोवणार

By Xtralarge News

March 31, 2022 4:21 pm

Ads

महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकावणे माजी मंत्री लोणीकरांना भोवणार..

मुंबई, दि. ३१ मार्च:

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देत लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

डॉ. नितीन राऊत म्हणाले की, ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश औरंगाबाद येथील महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत.

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या ध्वनीफिती बद्दलच्या बातम्यांची दखल घेतली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. या ध्वनिफितीतील संवाद व भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणा-या एका पक्षाचे ३० वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा या निमित्ताने फाटला आहे.

लोणीकर हे १० लाख वीज बिल भरल्याचे सांगत असले तरी त्यांच्या दोन्ही घरांची थकबाकी जवळपास ४ लाख रुपये आहे. लोणीकर यांनी महावितरणच्या अधिका-यांना निलंबित करण्याची धमकी देणे हा शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा व शासकीय अधिका-यांवर चुकीच्या कामांसाठी दबाव टाकण्याचा प्रकार आहे. लोणीकर यांनी महाराष्ट्राची व महावितरणच्या अधिका-यांची माफी मागायला हवी. दलित वस्त्यांबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही आक्षेपार्ह आहे. यावरून त्यांची दलित समाजाबद्दलची मानसिकता दिसून येते, अशी टीका ही डॉ. राऊत यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment