‘सेव्हन हिल्स’मध्ये कर्करोग उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्या !
‘सेव्हन हिल्स’मध्ये कर्करोग उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्या !
मुंबई, दि. 30 मार्च :
कर्करोगावर उपचार करण्यासाठी राखीव असलेल्या भुखंडावर उभारण्यात आलेल्या मनपाच्या सेव्हन हिल रुग्णालयात कर्करोगावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय सुविधेसह १०० खाटांची सुविधा सुरू करावी, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोगेश्वर विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी पाठविले आहे.
वायकर म्हणतात, सेवन हिल रुग्णालयात कर्करोग उपचार सेवा सुरू केल्यास पश्चिम उपनरातील अनेक रुग्णांना या सेवेचा लाभ घेता तर येईलच त्याचबरोबरच टाटा मेमोरियल रुग्णालयावर ताण कमी होण्यास ही मदत होईल. मुंबई उपनगरातील लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असून या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक मुलभूत वैद्यकीय सुविधा पुरविताना प्रशासकीय यंत्रणांवर ताण पडत आहे. मुंबई शहरातील टाटा मेमोरीअल रुग्णालय हे कर्करोगावर परिपूर्ण उपचार करणारे एकमेव रुग्णालय असून या ठिकाणी विविध राज्यातून, जिल्ह्यातून तसेच देश व विदेशातील कर्करोग्रस्त उपचारासाठी येतात. त्यामुळे दरदिवशी या रुग्णालयावरील ताण वाढत असून उपचारासाठी रुग्णांना महिनो महिने वाट बघावी लागते. अशा रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्यास रोगीच्या तीव्रतेत वाढ होऊन रुग्ण दगावण्याच्या संख्येत वाढ होते.
मुंबई पश्चिम उपनगरातील अंधेरी (पूर्व) मुंबई महानगरपालिकेच्या कर्करोग रुग्णालयासाठी आरक्षित जागेवर मनपाने सेव्हन हिल रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णालय तर सुरु झाले, परंतु कर्करोग उपचाराची सुविधा अद्याप सुरू करण्यात न आल्याने हे सेवा सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधांसह कर्करोगग्रस्तांसाठी १०० खाटा उपलब्ध करुन दिल्यास मुंबई उपनगरातील कर्करोगग्रस्तांना मोठया प्रमाणात आधार तर मिळेलच त्याचबरोबर वेळेवर उपचार ही मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कर्करोग ग्रस्तांसाठी सेव्हन हिल रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केल्यास कर्करोगग्रस्तांना याचा लाभ मिळू शकतो, असे वायकर यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील कर्करोगग्रस्त रुग्णांची गरज लक्षात घेता सेव्हन हिल रुग्णालयात वैद्यकीय सुविधेसह तातडीने १०० खाटा उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ते निर्देश देण्याची विनंती, आमदार वायकर यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
