सोशल मीडियाचा गैरवापर लोकशाहीसाठी घातक
सोशल मीडियाचा गैरवापर लोकशाहीसाठी घातक…
नवी दिल्ली, दि. १६ मार्च:
सोशल मीडियाच्या गैरवापराच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली. राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला जात असून लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे असा घणाघाती आरोप सोनिया गांधी यांनी केला.
लोकसभेत बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, आपली लोकशाही हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग वाढत आहे. फेसबुक, ट्वीटरसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून आपले नेते, पक्ष यांच्याकडून राजकीय कथानकांची मांडणी करण्याचे प्रमाण वाढत आहे. या सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना योग्य संधी देत नाहीत. सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने ज्या प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे ते आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीच्या राजकारणात फेसबुक आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांचा हस्तक्षेप थांबवावा. ही गोष्ट पक्ष आणि राजकारणाच्यावर आहे. सत्तेत कोणीही असो, आपली लोकशाही आणि सामाजिक सौहार्दाचे रक्षण आपणच केले पाहिजे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात फेसबुकला सत्तेचा फायदा झाल्याचे म्हटले आहे. यासारखे इतरही अनेक अहवाल आहेत. सोशल मीडियाच्या मोठमोठ्या कंपन्या आस्थापनाला पाठिंबा देत असल्याचे अनेक प्रसंगी समोर आले आहे.
जागतिक सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना समान संधी देत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. फेसबुकने अनेक वेळा नियम तोडले आहेत. यामध्ये सत्ताधारी पक्षांना मदतीचा हात देण्यात आला आहे. ज्या प्रकारे चुकीची माहिती पसरवली जात आहे आणि लोकांच्या मनात द्वेष भरला जात आहे, त्यामुळे आपला सामाजिक एकोपा बिघडत आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी चांगले नाही.
कॉर्पोरेट, सत्तापक्ष आणि सोशल मीडिया कंपन्यांचे धोकादायक युती देशासाठी आव्हान आहे.
