सुशांतची आत्महत्या: बाॅलिवूडमधील नागडं सत्य!

0
20200808_125147

 

वरिष्ठ पत्रकार सुनिल बोधनकर यांचा विशेष लेख…

मुंबई, दि. 8 ऑगस्ट

सुशांत आत्महत्या प्रकरणात (खुनात नव्हे) महाराष्ट्र सरकारनं, त्यातल्या त्यात गृहखात्यानं (मुंबई पोलिसांनी नव्हे) ‘काट्याचा नायटा’ करून ठेवलाय. साधं आत्महत्येचं प्रकरण फक्त सोशल मीडियाच्या दबावात येऊन म्हणा किंवा बॉलिवुडमधल्या बड्या धेंडांवर धौस जमवण्यासाठी म्हणा हवं तर, चिघळवून ठेवलंय. सुशांतनं आत्महत्येपूर्वी कसलीही चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती, तरीही, बड्या मंडळींना पोलीस चौकशीला बोलावलं, आणि ही मंडळी काही लागलीच उठून आली नसणार, कोट्यवधी रुपयांचे सिनेमे बनवणाऱ्या या मंडळींकडे तितक्याच ताकदीची वकील मंडळी आहेत या वकिलांनी जे बोलायला सांगितलं त्यांनी ते आणि तेवढंच बोललं असणार, मग पुन्हा त्यातून निष्पन्न होण्यासारखं नाही. दुसरा मुद्दा माझा असा समज आहे कि, हायप्रोफाईल केसेसमध्ये मुंबई पोलीस तपासाचा प्रोटोकॉल अगदी काटेकोरपणे पाळतात. त्यामुळे सुशांतच्या केसमध्ये अगदी पोस्टमार्टेमपासून ते अगदी फॉरेन्सिंक तपासापर्यंत अगदी सगळं प्रोटोकॉलनुसार केलं गेलं असणार. त्यामुळे त्या तपासात काही खोट काढता येणं मला तरी सध्या अशक्य वाटतंय.

मुळात परिवारवादामुळे सुशांतनं आत्महत्या केलीय हा दावाच मला हास्यास्पद वाटतो, सुशांतला ऑफर केले गेलेले सिनेमे कोणते, रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत आणि बेफिक्रे. मग या सिनेमात कुणाला घेतलं गेलं? रणवीर सिंहला! कुठेतरी त्याच्या नावाचा बोभाटा आहे का? नाही, शिव्याशाप कुणाला, शाहरूख, सलमान, करण जोहर, आलिया भट्ट, कालपरवा आलेल्या चंकी पांडेच्या मुलीला, का बरं? कारण ही खान मंडळी सॉफ्ट टारगेट आहेत.
राजकुमार राव, आयुष्मान खुराणा, हे कुणाचे नातेवाईक आहेत? आज ते सुपरस्टार आहेत, आजही राजकुमार राव 12 तासांपेक्षा जास्तची शिफ्ट करतो. आजही आयुष्मान आधी मी स्क्रिनटेस्ट देतो असं म्हणून स्क्रिनटेस्टसाठी उभा राहतो, त्याला अंधाधुनसाठी स्क्रिनटेस्ट देताना मी स्वतः पाहिलंय. त्यात तो कमीपणा मानत नाही आणि माझ्या स्टाफसाठी सबवेमधून खायला मागवलं नाही किंवा स्टारबग्सची कॉफी नाही मागवली म्हणून शूट सोडून जाणारे महाभागही मी पाहिलेत.
दीपक डोबरियालचा एक किस्सा सांगतो, तो शूटसाठी येणार होता, आराम नगरच्या आमच्या स्टुडियोचा पत्ता मी त्याला सांगितला तो म्हणाला भाई आराम नगर की सारी गलियां पता है मैं पहुंच जाऊंगा. तो कसा आला, तर ऑटोमधून! पोहोचल्यावर त्याने फोन केला यार ये आराम नगर में बंगला नंबर #### यही है न? मी म्हणाला हो, तो म्हणाला, “यार तेरी रिसेपशनिस्ट मुझे अंदर नही आने दे रही!” आम्ही सगळे त्याला रिसीव करायला बाहेर धावलो, तो काहीही न झाल्यासारखा आमच्यासोबत आला, शूटच्याआधी त्याला विचारलं आप खाने में क्या लेंगे, तो म्हणाला, “भाई कुछ भी मंगालो लेकिन, वो वर्सोवा मेट्रो स्टेशन के नीचेवाला समोसा चाटवाले से एक समोसा ग्रेव्ही और वहीं का एक वडापाव जरूर मंगवाना!” आम्ही सगळे चाट पडलो कारण, त्याची डिमांड ही आतापर्यत आलेल्या सगळ्यांपेक्षा ‘युनिक’ होती! तर आदल्या दिवशीच आलेल्या निम्रत कौरनं डिमांड करून करून आमचा जीव खाल्ला होता त्यातही फक्त चारच तास शूट होऊ शकलं होतं.
दिपक डोबरियालसारखाच अनुभव मनोज बाजपेयी पासून ते अगदी मनू रिषीपर्यंत. त्यामुळे कोण काय मानसिकतेचा आहे याचा काही प्रमाणात अनुभव मी त्या काही वर्षांमध्ये घेतला.
नेपोटिज्म हा शब्द खुप गुळगुळीत झालाय, कंगनाने मणिकर्णिकामधून सोनू सूदला का काढून टाकलं याचं उत्तर ती कधीच देत नाही. तेज, रास्कल आणि वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई या सिनेमातले रोल तिला कुणामुळे मिळालेत हेही कधी तरी तीनं सांगावं, तिच्यामुळे कुण्या सुपरस्टारचं घर तुटणार होतं आणि ते करण जोहरमुळे कसं वाचलं, त्या सुपरस्टार हिरोच्या, सुपरस्टार अभिनेत्रीनं कंगनाला काय काय सुनावलं होतं, त्यानंतर कंगना तिला कशी वचकून असते, हेही कधीतरी बाहेर येईलच की!
हिंदी सिनेसृष्टी ही अत्यंत बेभरवशाची आणि अत्यंत संघर्ष करावी लागणारी इंडस्ट्री आहे हे कुणालाच टळलेलं नाही, आता कुणी गेल्यानंतर त्याच्याबद्दल वाईट बोलू नये पण सुशांत काय ताकदीचा अभिनेता होता हे ड्राईव्ह सारखा करण जोहरचा सिनेमा कुणी वितरक खरेदी करत नाही त्यातल्या त्यात ग्लॅमर कोशंट म्हणून जॅकलिन असतानाही त्यावरून लक्षात यावं. एवढंच काय त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराच्या शूटवरून एक्ट्रेस संजना ही किती वेळा अर्धवट शूट सोडून पळून गेली आणि का हे गुगल करा अनेक न्यूज साईट्सवर सापडेल.
त्याच्या आत्महत्येइतकी आशुतोष भाकरे किंवा इतर कुणाच्या आत्महत्येची दखल का घेतली गेली नाही? हे म्हणजे केरळमध्ये हत्तिणीला स्फोटकं खायला घालून मारल्यानंतर जितका उद्रेक झाला होता तितका उद्रेक दुसऱ्या एका प्रदेशात एका माकडाला फाशी देऊन त्याचं व्हिडिओ शूट करून ते व्हायरलं केल्यानंतरही झाला नाही……

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *