राज्यातील ११ जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर जास्त!
मुंबई, दि. 8 ऑगस्ट
कोरोना विरुध्दच्या लढाईत महाराष्ट्र निश्चितपणे चांगले प्रयत्न करीत आहे पण आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कंटेन्मेंट क्षेत्राच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी. घरोघर भेटी सुरूच ठेवाव्यात, जे अजूनही सक्रिय कंटेन्मेंट असतील त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे. रुग्णाचे ८० टक्के संपर्क शोधून ७२ तासांच्या आत त्यांच्या सर्वांच्या चाचण्या कराव्यात, नवीन काही हॉटस्पॉट निर्माण होत आहेत का ते बारकाईने पाहावे, १४० चाचण्या दर दशलक्ष दर दिवशी प्रत्येक जिल्ह्याने केल्याच पाहिजेत, एन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली तरी अति आत्मविश्वास न ठेवता अशा व्यक्तींच्या लक्षणानुसार आरटीपीसीआर चाचणी केलीच पाहिजे, चाचणी संकलित केल्यानंतर २४ ते ३६ तासांत अहवाल आलाच पाहिजे. रुग्ण सेवा आणि रुग्णालय व्यवस्थापन यांचा मृत्यू दर कमी होण्यात मोठा भाग असतो, त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा सूचना केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी केल्या.
वृद्ध आणि इतर आजार असलेल्यांनी लवकर रुग्णालयात यावे.
लव अग्रवाल म्हणाले, साधारणपणे वृद्ध व्यक्ती या रुग्णालयांत येण्यास टाळाटाळ करतात आणि मग प्रकृती गंभीर झाली की धावाधाव करता यामुळे मृत्यू दर वाढतो आहे. देशाच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रातील आरोग्य सेवकांना जास्त झाल्याचे आढळते हे प्रमाणही कमी करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. देशात हे प्रमाण ७ टक्के तर महाराष्ट्रात सरासरी २१ टक्के प्रमाण आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राने काही गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर कोरोना मुकाबल्यात महाराष्ट्र हे देशासमोरचे एक उदाहरण होऊ शकते असेही ते म्हणाले.
सध्या महाराष्ट्रातील मृत्यू झालेल्या रुग्णांचे विश्लेषण केले तर असे आढळते की, ४५ ते ५९ या वयोगटात १७.९ टक्के मृत्यू इतरही आजार असलेल्या रुग्णांचे आहेत. ६० ते ७४ या वयोगटात २९.७० टक्के मृत्यू इतरही आजार असलेल्या रुग्णांचे तसेच ४० टक्के मृत्यू हे ७५ पेक्षा जास्त वयोगटातील इतर आजार असलेल्यांचे आहेत.
१० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित..
राज्यातील ११ जिल्ह्यांमधील मृत्यू दर हा राज्याच्या सरासरी मृत्यू दरापेक्षा जास्त आहे. पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, नागपूर, पालघर, सांगली या १० जिल्ह्यांमधून गेल्या आठवड्यात ७९ टक्के रुग्ण आढळले आहेत असे लव अग्रवाल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितलं. महाराष्ट्राचा मृत्यू दर ३.४७ टक्के असून देशाचा मृत्यू दर २.०७ टक्के आहे. पुणे २.३७ टक्के, ठाणे २,७२ टक्के, मुंबई ५.५० टक्के, नाशिक २.८२ टक्के, औरंगाबाद १.९७ टक्के, कोल्हापूर २.५३ टक्के, रायगड २.७८ टक्के , पालघर १.९३ टक्के, जळगाव ४.५१ टक्के, नगर १. १९ टक्के अशी प्रमुख जिल्ह्यांची मृत्यू दराची आकडेवारी असून ती कमी करण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे असे ते म्हणाले.
