मलिकांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही !
मलिकांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही !
मुंबई, १ मार्च २०२२
मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणे आहे. देशद्रोही गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा बुधवारी २ मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. परंतु त्यांनी राजीनामा घेतला नाही तर भारतीय जनता पार्टी विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिने तीनशे कोटींची मालमत्ता बळकावली व ती तांत्रिकदृष्ट्या नवाब मलिक यांच्या कंपनीच्या मालकीची असल्याचे दाखविले. दाऊदसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या गंभीर आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने नवाब मलिक यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने पुराव्यांचा विचार करून अधिक तपासासाठी मलिक यांना ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रिमोट कंट्रोलने महाविकास आघाडी सरकार चालविणारे शरद पवार हे तातडीने नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मलिक यांच्या राजीनाम्यास नकार देऊन मंत्रिमंडळ त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले हे धक्कादायक आहे.
१९९२ व १९९३ च्या मुंबईतील दंगल व बॉम्बस्फोटाच्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी प्रखर भूमिका घेतली होती. आज त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री असताना मात्र त्या बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांना साथ देणाऱ्या मंत्र्याची पाठराखण करतात हे धक्कादायक आहे. ही त्यांची राजकीय तडजोड असली तरी आम्ही ते सहन करणार नाही. उद्यापर्यंत नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आला नाही तर भाजपा विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही. आम्ही सतत आवाज उठवू. नवाब मलिक यांचा राजीनामा होईपर्यंत भाजपाचे आंदोलन चालू राहील.
