शिवसेनेची लढाई कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची !

0
20210915_223025

शिवसेनेची लढाई कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची !

मुंबई, दि. 26 फेब्रुवारी :
मुंबई महानगरपालिकेच्या घोटाळ्याची कारवाई झाली असेल तर 40 हजार कोटी रुपये ज्या अर्थसंकल्पाचे खर्च होतात, तो कर भूमिपुत्रांनीच दिलेला आहे. त्याचा हिशोब भूमिपुत्रांनीच मागितला आहे. भूमिपुत्रांच्या पैशावर तुमचे इमले उभे राहिले, भूमिपुत्रांच्या पैशावर भ्रष्टाचाराचे मजले तुम्ही बांधले, त्या विरोधात खरी भूमिपुत्रांची लढाई आहे. भारतीय जनता पार्टी ही भूमीपुत्रांचीच लढाई लढते आहे. तर कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची लढाई हा महापौर आणि शिवसेनेचा कार्यक्रम आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार पुढे म्हणाले की, राज्यासमोर गंभीर प्रश्न आ वाचून उभे आहेत, सामान्य जनता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांचं सुरळीत आयुष्य सुरु करावं म्हणून कामाला लागली आहे. त्या वेळेला राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक, युवक, महिला, बारा बलुतेदार या सगळ्यांना उभारी देण्यासाठी उभारावे ही प्राथमिकता आहे. मात्र सरकारची प्राथमिकता राज्याच्या प्रश्नांना नाही. शेतकऱ्याला कशी मदत करता येईल ,आमच्या आदिवासी आश्रम शाळांना मदत कशी करता येईल, शाळांचा विकास कसा करता येईल,बारा बलुतेदार यांना रोजगार कसा देता येईल, करोनामध्ये दुर्देवाने जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या परिवाराने मदतीसाठी अर्ज केले त्यांना मदत कशी मिळेल, या सगळ्या प्रश्नांवर कानाडोळा करण्याचे काम ठाकरे सरकार करते आहे.

केवळ एकाच गोष्टीवर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार काम करते ते म्हणजे, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, आतंकवाद याच्या समर्थनार्थ पूर्णवेळ खर्च केला जातो आहे. भ्रष्टाचाराचा महामेरू अशा स्वरूपाचे वर्णन करावे लागेल इतकी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात सरकारचे आहे.

एका वाक्यात सांगायचं झालं तर आज देश आणि महाराष्ट्र अशा वळणावर उभा आहे जीथे “लोकशाही विरुद्ध घराणेशाही” या संघर्षाला सुरुवात झाली असून हा संघर्ष टोकदार होत जातो आहे. जनतेला भ्रष्ट व्यवस्था नको आहे, त्यामुळे ही लढाई जनतेची आहे, असे शेलार म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *