राज्य शासकीय कर्मचाऱ्यांशी अजित पवारांची यशस्वी मध्यस्थी !

0
IMG-20220110-WA0038

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांशी अजित पवारांची यशस्वी मध्यस्थी !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक

मुंबई, दि. 23 फेब्रुवारी :
राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे.
शासकीय कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्याच्या हिताचा विचार करुन प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्र्यांनी केलेली यशस्वी मध्यस्ती आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रस्तावित संप मागे घेण्याची तयारी राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी दर्शवली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या विविध अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनासंकटामुळे राज्यासमोर निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आर्थिक परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येत आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रास्त, न्याय, व्यवहार्य मागण्यांबाबत राज्य शासन निश्चितपणे योग्य निर्णय घेईल. राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हक्क जपले जावेत, त्यांना न्याय मिळावा, हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. मात्र राज्याचा विकास थांबू नये, हित जपलं जाईल, याची काळजी घेतली पाहिजे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाची संप करू नये, राज्याचं हित लक्षात घेऊन संपाच्या निर्णयाचा फेरविचार करुन कर्मचारी संघटनांनी शासनाला सहकार्य करावे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याची तयारी दाखवली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. सर्व मागण्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मुद्यावर महाविकास आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले. संघटनांच्या संप मागे घेण्याबाबत सकारात्मक तयारी दर्शवल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त करत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठीशी, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे असल्याचे स्पस्ष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *