ठाकरे सरकारने सत्तेचा गैरवापर करू नये !
ठाकरे सरकारने सत्तेचा गैरवापर करू नये !
मुंबई दि. 22 फेब्रुवारी :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू असून मुंबई महानगरपालिकेने राणे यांच्या घराची झाडाझडतीही घेतली परंतु ठाकरे सरकारने सत्तेचा गैरवापर करू नये अशी जनतेची भावना आहे. सरकारने सूडबुध्दीचे राजकारण थांबवावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
केंद्र सरकारवर ईडी आणि सीबीआय चौकशीचा वापर सूडबुध्दीतून केला जातो असा बिनबुडाचा आरोप विरोधक करतात मात्र ईडी आणि सीबीआय या स्वतंत्र स्वायत्त संस्था आहेत. या संस्था त्यांच्या पध्दतीने आरोपांची चौकशी करीत असतात. त्यांच्या कारवाईशी केंद्र सरकारचा काही संबंध नसतो. मात्र राज्यात ठाकरे सरकारच्या काळात ज्या कारवाया चालु आहेत तसेच ज्या आरोपांचे राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल प्रतिमेला शोभणारे नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला सांस्कृतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या मोठी उंची लाभली आहे. एकमेकांना सन्मान देत मर्यादा सांभाळुन राजकीय घडामोडी होत असतात मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या काळात सत्ताधारी पक्षाकडून होणारे आरोप आणि कारवाई ही किती नैतिक पातळीला आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल प्रतिमेला शोभणारी आहे याचा विचार सर्व पक्षांनी केला पाहिजे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या राजकीय उंचीला खुजी करण्याचा प्रयत्न करू नये, सूडबुध्दीच्या राजकारणाला पुर्णविराम द्यावा हीच महाराष्ट्राच्या जणतेची ईच्छा आहे, असे आठवले म्हणाले.
