पंढरपूर पोटनिवडणुकीत पराभव कसा झाला ?
पंढरपूर पोटनिवडणुकीत पराभव कसा झाला ?
पंढरपूर , दि. २२ फेब्रुवारी :
पंढरपूरमध्ये आपल्या हातातला विजय निसटला आणि पराभव हाती मिळाला. वातावरण आपल्या बाजुने असताना इथे पराभव कसा झाला. प्रत्येक ठिकाणी बुथ कमिट्या असत्या तर हा पराभव झाला नसता परंतु पराभव झाल्यावर संघटना नीट ठेवण्याची जबाबदारी होती. आपल्यासाठी झटणाऱ्या लोकांसाठी किती प्रयत्न केला याचा अभ्यास केला पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान मंगळवेढा मतदार संघातील सभेत जयंत पाटील बोलत होते
जयंत पाटील पुढे म्हणाले की, पराभव का झाला याचे कारण आपल्याला माहीत असताना आपण काम करायला हवे.भारत भालके यांचे काम खुप मोठे आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभेल असे काम आपण करायला पाहिजे. नाना नेहमीच ३५ गावाच्या प्रश्नांसाठी माझ्याकडे यायचे अशी आठवण सांगताना आज ती योजना पूर्णत्वास आली आहे. लवकरच योजना येईल आणि या भागातील ३५ गावांच्या कामाचा प्रश्न सुटेल.
या भागाचा आणखी विकास आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला या भागात राष्ट्रवादीची ताकद अधिक वाढवावी लागेल. आज आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे, याआधी कशी काही परिस्थिती नव्हती. कोरोनाच्या काळात देशभरात महाराष्ट्राने चांगले काम केले, जागतिक पातळीवर याची दखल घेतली गेली. त्यामुळे महाराष्ट्राला आपली गरज जास्त आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेतील दुसरी सभा पंढरपूर मतदारसंघात पार पडली. या सभेनंतर जयंत पाटील यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिपकआबा साळुंखे, कार्याध्यक्ष उमेश पाटील,भगीरथ भालके, कल्याणराव काळे, महिला निरीक्षक दिपाली पांढरे, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई गुंड, शहराध्यक्ष सुधीर भोसले, पंढरपूर तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, मंगळवेढा तालुकाध्यक्ष पी. बी. पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
