सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ‘त्या’ खुनांमागे कोण ?

0
narayan rane

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ‘त्या’ खुनांमागे कोण ?

शिवनेसेनेचे नारायण राणेंना खुले आव्हान..

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी:

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेनेनेही राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सिंधुदुर्गात झालेल्या हत्या, खंडणी वसुली प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून त्या सर्व हत्यांची चौकशी करण्याची मागणी करू, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला.

शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्गात गेल्या नऊ वर्षांत अनेक घटना घडल्या, मंचेकर, गोवेकर, भिसे यांच्या निर्घृणपणे हत्या झाल्या. सिंधुदुर्गात ज्या राजकीय हत्या झाल्या आहेत त्याबाबत आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असून चौकशी करण्याची मागणी करणार आहोत.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधान परिषदेत नारायण राणेंची कुंडली मांडली होती. सिंधुदुर्गातील काही खुनांबद्दलही फडणवीस यांनी भाष्य केले होते. त्यामुळे आम्ही दिलीप वळसे पाटील यांना भेटून सिंधुदुर्गातील आजवरच्या राजकीय हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. या हत्यांमागचे खरे गुन्हेगार कोण होते त्याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत असे विनायक राऊत म्हणाले. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. अविघ्न पार्क सोसायटीत हा घोटाळा झाला होता, असे सोमय्या बोलत असतानाचा व्हिडिओही राऊत यांनी यावेळी दाखवला.

एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून धमकी देणे हे पदाचा दुरुपयोग करण्यासारखे आहे. एकतर ईडीच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली असेल, किंवा ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रे चोरली असेल, अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली. याबाबत आपण लोकसभेत आवाज उठवणार आहोत असेही विनायक राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *