महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही
महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही…
मुंबई, दि. 19 फेब्रुवारी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात राज्यातल्या प्रत्येक पिढीने जपला. महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान जागवण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे आपले भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहिली आहे, यापुढेही तशीच राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून वंदन केले.
शिवजयंतीनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. महाराजांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केले आणि ते रयतेला अर्पण केले. महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी होते. महाराज दूरदृष्टीचे नेते होते, बिकट प्रसंगात त्यांनी प्रसंगी तात्पूरती माघार घेतली, परंतु रयतेला धोका होईल, असा निर्णय घेतला नाही.
महाराजांच्या या इतिहासातून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा शिकला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण, डोळ्यासमोर ठेवून, दूरदृष्टीने घेतला होता, हे आपल्या लक्षात येईल. राज्यातले महाविकास आघाडी सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, धोरणांना, कारभाराला आदर्श मानून काम करत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे.
