अहमदाबाद बॉम्बस्फोटप्रकरणी ३८ जणांना फाशी
अहमदाबाद बॉम्बस्फोटप्रकरणी ३८ जणांना फाशी..
अहमदाबाद, दि १८ फेब्रुवारी :
अहमदाबादमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ जणांना फाशी तर ११ जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने ४९ आरोपींना दोषी ठरवले होती. एखाद्या प्रकरणी एवढ्या मोठ्या प्रमाणात फाशीची शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे. जुलै २००८ मध्ये अहमदाबाद बॉम्बस्फोटाने हादरले होते. या प्रकरणी युएपीए अंतर्गत ७८ पैकी ४९ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. तपासात मदत केल्याबद्दल दोषींपैकी एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. २९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अहमदाबादच्या बॉम्बस्फोटांत ५६ जणांचा मृत्यू झाला होता तर २०० हून अधिक जखमी झाले होते. गेल्या आठवड्यात विशेष कोर्टाने ४९ जणांना दोषी ठरवले होते.
२००२ च्या गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता, असा आरोप करण्यात आला होता. १९ दिवसांत ३० दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. यानंतर उर्वरित दहशतवादी देशातील विविध शहरांतून पकडण्यात आले. या स्फोटांत सहभागी असलेल्या अन्य ८ आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे. या बॉम्बस्फोट मालिकेचा मास्टर माईंड यासीन भटकळ हा दिल्लीतील तुरुंगात तर अब्दुल सुभान उर्फ तौकीर हा कोचीन येथील तुरुंगात कैद आहे.
