Ads

--

‘दरबार हॉल’ लोककल्याणकारी उपक्रमांचे केंद्र बनावे

By Xtralarge News

February 12, 2022 12:07 pm

Ads

‘दरबार हॉल’ लोककल्याणकारी उपक्रमांचे केंद्र बनावे…

मुंबई, दि. 12 फेब्रुवारी :
आपल्या संविधानानुसार, ‘आम्ही भारताचे लोक’ हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा उद्घाटन सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे. राजभवनासह दरबार हॉल देखील लोककल्याणकारी उपक्रमांसाठी एक प्रभावी केंद्र बनेल, असे उद्‍गार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काढले.

राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते  झाले. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, राजभवनात कोणतीही वैयक्तिक किंवा कोणतीही गोपनीय बाब नाही. जे काही घडते ते सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांसोबत, सार्वजनिकपणे पारदर्शकपणे, लोकसेवकांकडून जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याची पद्धत रूढ होत आहे. अशा प्रकारे हे नवे दरबार हॉल नव्या संदर्भातील आपल्या नव्या भारताचे, नव्या महाराष्ट्राचे आणि आपल्या चैतन्यशील लोकशाहीचे नवे प्रतिक आहे.

 

राजभवनाच्या या दरबार हॉलमध्ये मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी मोरारजी देसाई यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता अशी आठवण यावेळी राष्ट्रपतींनी जागविली. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडे मला त्यांचे स्वीय सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र हे नावाप्रमाणेच महान राज्य असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, राज्याच्या महानतेला अनेक परिमाण आहेत. महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांचीच नावे मोजली तरी यादी संपणार नाही. शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक व्यक्तिमत्त्वांमध्ये महाराष्ट्राच्या महानतेचा असा अफाट प्रवाह दिसतो.

यापूर्वी अनेकदा महाराष्ट्रात यायची संधी मिळाली, मात्र यावेळच्या प्रवासात मला एक पोकळी जाणवतेय. असे सांगून राष्ट्रपतींनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याविषयी शोकभावना व्यक्त केल्या. त्याच्यासारखी महान प्रतिभावान गायिका शतकात एकदाच जन्माला येतात. लताजींचे संगीत अमर आहे, जे सर्व संगीत प्रेमींना नेहमीच मंत्रमुग्ध करेल. यासोबतच त्यांच्या साधेपणाची आणि सौम्य स्वभावाची आठवणही लोकांच्या मनावर उमटणार आहे. मला व्यक्तिश: त्यांचा स्नेह मिळाला. त्यांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. असे कोविंद म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment