माझा राजकीय प्रवास फक्त आणि फक्त आनंद दिघेंमुळेच

0
IMG-20220208-WA0062

माझा राजकीय प्रवास फक्त आणि फक्त आनंद दिघेंमुळेच.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन….

ठाणे, दि. 9 फेब्रुवारी :
लोकांचे दुःख आपले दुःख मानून काम करत राहिलो म्हणूनच सर्वसामान्य लोकांकडून हे प्रेम आणि आदर मिळाल्याचे उद्गार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होतं ते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘लोकनाथ’ या विशेष गाण्याच्या ध्वनिचित्रफितीच्या अनावरण सोहळ्याचे.

एससीआर कम्युनिकेअर, साहिल मोशन आर्टस्, सुमन एंटरटेनमेंट आणि सप्तसूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे गाणे तयार करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी लिहिलेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केले आहे. तर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर आणि अवधूत गुप्ते यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांच्या हस्ते या गीताचे अनावरण करण्यात आले. यावेळी या सोहळ्याला अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

अभिनेता सुनील शेट्टी याने बोलताना एकनाथ शिंदे यांना आपण सर्वच जण एक सजग नेता म्हणून ओळखतो, माझी ओळख त्यांच्याशी तीन वर्षापूर्वी झाली. मात्र कायमच त्यांनी मला आदर आणि कुटूंबातील एका सदस्यासाठी वागणूक दिलेली आहे. आज मंचावर आल्यावर देखील त्यानी इतरांप्रमाणेच साधी खुर्ची मागवून तिच्यावर बसणे पसंत केले. सगळी प्रमुख माणसे मंचावर येऊन बसली की नाही याबद्दल ते कमालीचे दक्ष होते. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच मोठ्या माणसांची खरी ओळख होते. सर्वसामान्यांचे नेते असं एकनाथ शिंदे यांना का संबोधले जाते ते यावरून स्पष्ट होते.

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, सिनेमात जसे संवाद बोलणारे हिरो हिरॉईन असतात तसेच आपल्या आजूबाजूला लोकांची कामे करून देणारे एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते असतात त्यामुळे लोकांच्या नजरेत तेच खरे हिरो असतात. त्यांचा प्रवास साधा आणि सोपा नव्हता मात्र ज्या जिद्दीने त्यांनी तो पूर्ण केला त्यासाठी दाद द्यायलाच हवी. आज मोठमोठे प्रकल्प पूर्ण करत असताना देखील त्यांनी सर्वसामान्य लोकांशी असलेली आपली साथ सोडलेली नाही. मला त्यांच्याबद्दल सगळ्यात जास्त कौतुक वाटते ते त्यांच्या शिक्षणाच्या ध्यासाबद्दल. प्रतिकूल परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत मात्र आज एवढ्या व्यस्ततेतुन वेळ काढून त्यांनी आधी बीए केलं आणि आता ते एमए करत आहेत याबद्दल खरच मी त्यांना सलाम करते.

या सोहळ्याला उत्तर देताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. समाजात वावरताना, मदत करताना, प्रशासनाशी संवाद साधताना, लोकांमध्ये वावरताना जमेल तेवढी खबरदारी घ्यावी लागते, कारण सत्ता,पद याचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी व्हायला हवा यासाठी आपण कायम दक्ष असतो असं त्यांनी स्पष्ट केलं. मी बोलतो कमी आणि ऐकतो जास्त त्यामुळे समस्येचा मुळाशी जाऊन त्यातील सर्व बाबी समजून घेणं मला सोपं पडतं आणि त्यांची सोडवणुक करता येते. युनिफाईड डीसीपीआर तयार करण्याचा निर्णय असेल किंवा कोकणातील पूरग्रस्तांना केलेली मदत असेल किंवा धोकादायक घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली क्लस्टर योजना असेल, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महमार्ग असेल, किंवा मग कोरोना काळात केलेले कार्य असेल कायम सर्वसामान्य माणसाचे हित हेच माझ्या डोळ्यासमोर असते आणि त्यानुसारच मी कार्यरत राहतो. माझ्या आयुष्यातील अवघड प्रसंगात मी आणि माझं कुटूंब कोलमडून गेलो होतो त्यावेळी दिघे साहेबांनी धीर दिला म्हणून आजवरचा हा प्रवास करणे शक्य झाले. आजवर मी जो काही राजकीय प्रवास केला तो फक्त आणि फक्त दिघे साहेबांमुळेच असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. आजही लोकांची सुख दुःख आपली मानून काम करत असल्याने हे प्रेम आणि आदर मिळत असल्याचे सांगत त्यांनी सगळ्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.

आज पार पडलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या एका कॉफी टेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तर लेखक दिग्दर्शक विजू माने यांनी सादर केलेली ‘शिंदे साहेब तुमच्यासारखे कुणीच नाही’…ही कविता उपस्थितांची विशेष दाद मिळवून गेली. याशिवाय शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या इंस्टाग्राम रिल्सच्या स्पर्धेचा निकालही जाहीर करण्यात आला. चार वर्षांच्या मुलाने या स्पर्धेत 50 हजारांचे पहिले पारितोषिक मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *