पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञान मोदी सरकारने खरेदी केले ?
पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञान मोदी सरकारने खरेदी केले ?
न्यूयॉर्क टाईम्सचा पेगॅसस प्रकरणी धक्कादायक खुलासा.
नवी दिल्ली, दि. २९ जानेवारी:
इस्राईलमधील एनएसओ कंपनीने विकसित केलेल्या पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पुन्हा एकदा गोत्यात आले आहे. मोदी सरकारने पेगॅसस प्रकरणी करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले असतानाच भारतासह काही देशांनी पेगॅसस स्पायवेअरची खरेदी केल्याचा धक्कादायक खुलासा न्यूयार्क टाईम्स या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने केला आहे.
न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै २०१७ मध्ये इस्राईल दौऱ्यावर गेले असता भारत आणि इस्राईल यांच्यामध्ये २ बिलियन डॉलर्सचा (१५ हजार कोटी रुपयांचा) शस्त्रास्त्र खरेदी करार करण्यात आला. यात क्षेपणास्त्र यंत्रणेसह पेगॅसस स्पायवेअरचा देखील समावेश आहे. इस्राईलला भेट देणारे नरेंद्र मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. यानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी जून २०१९ मध्ये भारत दौरा केला होता.आतापर्यंत भारत किंवा इस्राईलपैकी कोणीही पेगॅसस खरेदीला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
पेगॅससचा वापर करून विरोधी पक्षाचे नेते, पत्रकार, संरक्षण दलातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, न्यायपालिकेतील लोकांवर पाळत ठेवण्यात आल्याचे आरोप झाले आहेत. भारत सरकारकडून अधिकृतपणे पेगॅसस खरेदीची कबुली देण्यात आली नाही. न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीमुळे एकच खळबळ उडाली असून मोदी सरकार पुन्हा वादात सापडले आहे.
