केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून महात्मा गांधींची दररोज हत्या !

0
Bapu MM

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून महात्मा गांधींची दररोज हत्या !

मुंबई, दि. २९ जानेवारी:

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून गेले ७ वर्ष रोज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या होत आहे. त्यांच्या विचारांचा रोज खून पाडला जात आहे हे अत्यंत निषेधार्ह आहे. असे आरोप माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.

मौलाना आझाद विचार मंचतर्फे माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे गांधीवादी देशवासियांनी निषेध नोंदविला, त्यावेळी ते बोलत होते.

हुसेन दलवाई पुढे म्हणाले की, आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात स्वतःला गांधीवादी विचारांचे आहोत असे खोटे बोलतात. भारत देश हा गांधींच्या विचाराने चाललेला आहे असेही सांगतात मात्र देशात आल्यानंतर गांधी विचारांची पायमल्ली करतात हे अत्यंत दुर्दैवी  आहे. “मुह मे राम बगल मे  छुरी” अशा पद्धतीचे वर्तन आमच्या देशात चालू आहे. RSS  विचारांचे सरकार केंद्रात आल्यानंतर भारतात ठीक ठिकाणी गांधीजींचा हत्यारा नथुराम गोडसेचे पुतळे उभारले गेलेत व त्याची RSS अनुयायांकडून रोज पूजा करण्यात येते. मध्यंतरी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले त्यावेळेस स्वतःला गांधीवादी विचारांचे मानणाऱ्या पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला नाही.

सध्या महाराष्ट्रात Why I killed Gandhi? या लघुपटाविषयी जोरदार चर्चा असून तो लघुपट लवकरच महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्पष्टपणे महात्मा गांधीजींचा खुनी नथुराम गोडसेच्या पाशवी कृत्याचे समर्थन करण्यात आले आहे. देशात पाच राज्यात निवडणूक होत असून उत्तर प्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित करून त्यांना हिंदू धर्मियांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करायचा असून देशभर पुन्हा वातावरण दूषित करायचे आहे. हे आम्हाला मान्य  नाही. Why I killed Gandhi? या लघुपटात महात्मा गांधींना खलपुरुष व गोडसेला हिरो दाखवले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी हा भारताचा आत्मा असून त्यांना आंतराष्ट्रीय स्तरावरही मान्यता आहे. म्हणूनच २ ऑक्टोबर हा दिवस अहिंसा दिवस म्हणून सर्व जगात साजरा केला जातो. देशातील या जातीवादी शक्तींनी गांधीजींच्या विचारांचा कितीही खून करण्याचा प्रयत्न केला तरीही गांधींचा विचार ते नष्ट करू शकत नाहीत. या देशाला भविष्यात गांधीजींचा विचारच प्रगतीकडे व एकात्मतेकडे नेवू शकतो असा आमचा ठाम विश्वास आहे, असेही हुसेन दलवाई म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *