मालेगावच्या महापौरांसह काँग्रेसचे २८ नगरसेवक राष्ट्रवादीत
मालेगावच्या महापौरांसह काँग्रेसचे २८ नगरसेवक राष्ट्रवादीत…
मुंबई, दि. २७ जानेवारी:
मालेगावमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व नगरसेवकांचे स्वागत केले तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. मालेगावमधील या पक्षप्रवेशामुळे आता पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार निश्चित झाला आहे अशी भावनाही व्यक्त केली. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत मालेगावमध्ये मोठी सभा घेणार असल्याचे सुतोवाच जयंत पाटील यांनी केले.
ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड आणि इतर महानगरपालिकांमध्ये विकास साधला आहे, त्याप्रमाणेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली मालेगावचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम करु, असाही विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सर्वांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी शेख रशीद शेख शफी १९९९ साली विधानसभेत आमदार म्हणून आले होते. मालेगावमधील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी त्यांचा पुढाकार असायचा. मालेगावचे प्रश्न तळमळीने मांडताना आम्ही त्यांना पाहिले आहे. शेख रशीद यांची समाजाशी बांधिलकी असल्यामुळे त्यांच्यासोबत मनपातील सर्व नगरसेवक राष्ट्रवादीत येत आहेत. शरद पवार यांनी कधीही जातीपातीचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन पक्ष चालवला. अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षण कमी आहे, त्यामुळे या समाजाला शिक्षणात प्रगती करण्यासाठी मालेगाव येते काय सुविधा उभारता येतील. मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळाच्या माध्यमातून काय योजना आखता येतील, याचा विचार आम्ही नक्कीच करु. तसेच हे आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी पुन्हा एकदा चांगला निधी मालेगावला देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मालेगावमधील कब्रस्तानशी निगडीत प्रश्न लवकर सोडवू असे आश्वासन दिले. तसेच कौशल्य विकास खात्यामार्फत मालेगाव येथे नवीन पॉलिटेकनिकल महाविद्यालय लवकरच उभारू असे आश्वासनही नवाब मलिक यांनी दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
