20200805_203804

समुद्र व रस्ता एकच झाला, झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आढावा. 

मुंबई, दि. 5 ऑगस्ट

मुंबईला दोन दिवसापासून पावसाने झोडपून काढंलय. मंगळवारी रात्रभर पावसाने धुमाकूळ घातला आणि   आज बुधवारी पुन्हा पावसाचे धुमशान सुरुच राहिले. दुपारनंतर तर पावसाने आणखी जोर धरला. या पावसाने मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई या मुंबईच्या परिसरात अक्षरशः धू धू धुतले. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले तर काही भागात झाडं पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने लोकल सेवांवरही परिणाम झाला आहे.

रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मस्जिद रोड ते भायखळा रेल्वे स्थानकांदरम्यान दोन लोकल ट्रेन अडकून पडल्या होत्या यामधील २०० प्रवाशांची सुटका करण्यात आली असून मदतीसाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. सीएसटी येथून कर्जतला निघालेल्या या लोकलमधून २०० जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.  दुसरी लोकल कर्जतहून सीएसटीला चालली होती.  ठिकठिकाणी पाणी साचले असून सीएसटी-ठाणे तसेच सीएसटी-वाशी लोकल बंद करण्यात आली आहे.

दोन दिवसांपासून सुरू असलेले पावसाचे हे धुमशान पुढील दोन तीन दिवस ही कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या १२ तासांत १५० मिमिपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
या मुसळधार पावसामुळं अनेक भागांत झाडे पडली. भायखळा, मरीन लाईन्स येथेही झाडं पडली..दक्षिण मुंबईत वादळी वारा व जोरदार पाऊसामुळे
कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, शहीद भगतसिंग मार्ग (RBI), महात्मा फुले मंडई, वूड हाऊस मार्ग कुलाबा, बॅक बे आपल्यासमोर वृक्ष पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नवी मुंबईतील डि. वाय. पाटील स्टेडियमलाही पावसाचा फटका बसला आहे.

मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला तर ताडदेव, डायना पुलाजवळ पाणी साचल्याने वाहने पाण्याखाली गेली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.

मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रेड अॅलर्ट जारी केलेला असून नागरिकांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *