जनतेच्या सहकार्याने कोरोनावर मात करू:

0
IMG-20220126-WA0099

जनतेच्या सहकार्याने कोरोनावर मात करू:

नाशिक, दि. 27 जानेवारी:
दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट कायम असले तरी जनतेच्या सहकार्याने कोरोनावर आपण मात करू शकतो. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पोलिस संचलन मैदानात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी जनतेला शुभेच्छा देतांना पालकमंत्री छगन भुजबळ बोलत .

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, नाशिकची दीडशे वर्ष, महाविकास आघाडी शासनाचे दोन वर्ष असा हा त्रिवार आनंदात साजरा होणारा 72 वा प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन साजरा करत आहोत, हे सांगतांना मनस्वी आनंद होत असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ म्हणाले, राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात दोन वेळचे अन्न उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 90 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 49 लाख 57 हजार 435 गरीब व गरजू लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला.

जिल्ह्यातील कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 36 कोटी 42 लाखांचे सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात आले असून कोविड-19 च्या काळात 0 ते 18 वयोगटातील दोन्ही पालक गमावलेल्या 23 बालकांना प्रत्येकी 5 लाख सानुग्रह अनुदान मुदत ठेवीच्या स्वरूपात देण्यात आले आहे. तसेच या बालकांना ‘बाल संगोपन योजनेंतर्गत प्रति महिना 1100 रुपये एवढा लाभ देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या बालकांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आत्तापर्यंत 3 लाख 13 हजार 59 रूपये फी संबंधीत शाळांना अदा करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात तिसऱ्या लाटेच्या वेळी मालेगावकरांनी आपल्या प्रतिकार शक्तिच्या जोरावर कोरोनाला रोखून धरले आहे. याबाबतची शास्त्रीय कारणमीमांसा शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संशोधनाचे काम करीत आहेत.

पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांसाठी राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या उभारी उपक्रमासाठी तसेच ऑनलाईन ७/१२ आणि सेल्फ बिनशेती चलन वितरण कार्यप्रणालीचे कौतुक करण्यात आले. सेवा हमी कायद्यात सर्वाधिक 101 सेवांचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या या योजनेचा विस्तार राज्यभर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे व यासाठी त्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेचा लोक प्रशासनातील नाविन्यपूर्ण कामगिरी साठीचा डॉ. गडकरी स्मृति पुरस्कार देखील प्रदान करण्यात आल्याने पालकमंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. तसेच बँकांमार्फत ही मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप झाल्याने त्यांच्या समस्या कमी होवून मागील वर्षांच्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाषणात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *