राज्यातील कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरू होणार..
मुंबई, दि. २६ जानेवारी:
कोरोनामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होत आहेत. कोरोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली.
कोरोनामुळे बंद करण्यात आलेली कॉलेज १३ ऑक्टोबर पासून ऑफलाइन सुरू करण्यात आली होती परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने ५ जानेवारीपासून राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता रुग्ण संख्या घटू लागल्याने १ फेब्रुवारीपासून कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसमात्रा पूर्ण झालेल्या नाहीत त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून लस देण्यात याव्यात. जे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. १५ फेब्रुवारीपर्यंत कॉलेज व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइनच घेण्यात याव्यात असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतरच्या सर्व परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात येतील.
कॉलेज सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून नियोजन करावे तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाइनची व्यवस्था करावी. विद्यापीठांनी आपल्या वेबसाइटवर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच, हेल्पलाइन नंबर ही माहिती उपलब्ध करुन द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
Leave a Comment