मंत्रालय कोणाच्या बापाच्या मालकीचे ऑफिस नाही !
मंत्रालय कोणाच्या बापाच्या मालकीचे ऑफिस नाही !
मुंबई, दि. २६ जानेवारी:
भाजपा खासदार किरिट सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन फाईल पाहिल्याचे प्रकरण चांगलेच तापले असून भाजपाने याप्रश्नी सरकारवर तोफ डागली आहे. कागद पत्रांची पडताळणी करताना खुर्चीवर बसणे हा देखील अधिकार आहे, हे सरकारी ऑफिस आहे, कोणाच्या बापाच्या मालकीचे ऑफिस नाही. ज्या प्रकारे नोटीशी दिल्या जात आहेत जणूकाही खासगी मालमत्ता आहे. या शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले, किरीट सोमय्यांना नोटीस देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कोणत्या अधिकारातून तुम्ही नोटीस पाठवली असा सवाल त्यांनी केला. जे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे ते नेमके कोणी काढले. ज्यांनी हा फोटो काढला तेच तक्रारदार आहेत. चोरी करायची आणि कोणी उघड करायचा प्रयत्न केला तर त्याला बदनाम करायचे हे खपवून घेतले जाणार नाही.
प्रताप सरनाईक यांच्या एका बांधकामाला कर माफ केल्याप्रकरणी नगरविकास विभागात जाऊन सोमय्या यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून या फाइल्स पाहिल्याचे फोटो समाज माध्यमांत व्हायरल झाले होते. याप्रकरणी तिन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून सरकारने सोमय्या यांनाही नोटीस बजावली आहे.
