शासनाचे नेतृत्व व प्रशासनाच्या कर्तृत्वावर कोरोनाचा सामना करू
शासनाचे नेतृत्व व प्रशासनाच्या कर्तृत्वावर कोरोनाचा सामना करू.
कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे.
नाशिक: 24 जानेवारी:
महाविकास आघाडी शासनाला प्रशासनाच्या कर्तृत्वाची मिळालेली साथ व जनतेची एकजूट यामुळे आजपर्यंत कोरोनावर मात केली, भविष्यातही त्याचा सामना करत राहू. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
येवला येथील पाटोदा गावात ग्रामपंचायत इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे व प्राथमिक आरोग्य इमारत व इतर विविध विकासकामांचे व देवगाव ग्रामपंचायत इमारत व विविध विकासकामांचे उदघाटन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते
भुजबळ पुढे म्हणाले की, लोकांची सेवा करण्याची शिकवण नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असून या दोन्ही नेत्यांना अभिवादन करतो. तसेच 2004 साली मी आलो तेव्हा जिल्ह्याला 36 कोटी निधी येत होता आज तो निधी 800 कोटीपर्यन्त आणला आहे. असेच तुमच्या सगळ्यांचे सहकार्याने या पुढेही चांगला विकास घडवूया अशी अपेक्षा पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली.
कोरोना काळात विकासकामे करण्यावर मर्यादा येत होती परंतु आता शासनाने निधी खर्च करण्यासाठी परवानगी दिल्याने लवकरात लवकर ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहे. यापुढेही आरोग्य विभागांतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न आणि रस्त्यांसाठी कामे करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी भर देण्यात येईल. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याला उद्योग, पर्यटन कृषी इत्यादी क्षेत्राच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ओळख मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच कोरोनामुक्त गाव होऊन विकासाकडे वाटचाल करू असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले
कोरोनासारखी लक्षणे असतांना घरगुती उपचार न घेता वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत, जेणेकरून इतरांना कोरोनाची लागण होणार नाही, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
