सोशल मीडियावरील ‘ते’ वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दलचे नाही!

0
Nana PM

सोशल मीडियावरील ‘ते’ वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दलचे नाही!

पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरणे आमची संस्कृती नाही.

मुंबई, दि. १७ जानेवारी:

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांद्याबद्दल मी अपशब्द वापरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हीडिओतील मोदी नावाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध नसून माझ्या मतदार संघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत मी बोलत होतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील स्थानिक गुंड मोदीबद्दल नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा तो व्हिडीओ असून खोडसाळपणे सोशल मीडियावर तो व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो की, मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो. पण भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर काही उतावीळ भाजप नेते त्या वक्तव्याचा संबंध खोडसाळपणे व जाणीवपूर्वक पंतप्रधान मोदी यांच्याशी जोडून पंतप्रधान मोदी यांचा तेच अवमान करत आहेत हे दुर्दैवी आहे.

भाजपाच्या नेत्यांनीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी यांच्याबद्दल सातत्याने अपशब्द वापरले , त्यांच्या बदनामीची मोहिमही राबवली पण काँग्रेसने नेहमीच संविधानिक पदावरील व्यक्तींचा आदर केलेला आहे. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते असतात, त्यांच्या पक्षाबद्दल वैचारिक मतभेद असू शकतात, त्यांच्या धोरणांवर, कामाच्या पद्धतीवर टीका केली जाऊ शकते परंतु त्यांच्याबद्दल व्यक्तीगत पातळीवर आम्ही कधीही अपशब्द वापरलेला नाही, आमची ती संस्कृतीही नाही. मी जे बोललो त्याचा पंतप्रधानांशी संबंध दाखवून नाहक बदनामी करण्याचा हा प्रकार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *