शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे निधन
शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे निधन..
मुंबई, दि. १७ जानेवारी:
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याच्या सामाजिक चळवळीतील एक झुंजार नेते अशी त्यांची ओळख होती. शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले.
प्रा. एन. डी. पाटील यांनी १९४८ साली शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. १८ वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. तर १९७८ ते १९८० याकाळात राज्याचे सहकार मंत्री होते. १९९९ साली आलेल्या लोकशाही आघाडी सरकारचे ते निमंत्रक होते. विधिमंडळाचे सदस्य म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडिकीने मांडले. लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे.
एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली….
महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारे संघर्षशील नेतृत्व हरपले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
प्रा. एन. डी. पाटील हे अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. महाराष्ट्राच्या विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा.एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले. एन. डी. पाटील यांच्याशी अत्यंत कौटुंबिक असे संबंध होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री प्रा.एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील एक ऋषितुल्य, लढवय्ये, लोकाभिमुख व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ते विधीमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होते. त्यांच्या रूपात शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज हरपला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित राहिले. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले होते. आचार, विचार आणि कर्तृत्वाने राजकारणात व समाजकारणात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. त्यांचा जीवनपट व कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहिल, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
