जागतिक नावलौकिक मिळविणारा फुटबॉल संघ तयार होईल

0
20220117_101818

जागतिक नावलौकिक मिळविणारा फुटबॉल संघ तयार होईल…

खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन…

नवी मुंबई, दि.16 जानेवारी :
खारघर शहर भविष्यात “स्पोर्टस् सिटी” म्हणून नावारूपाला येईल यात शंकाच नाही. या ठिकाणी सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मैदानात सराव करणारा भारताचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर भारताच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे.

यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र शासनाचे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार मानले.नव्या पिढीचा आवडता खेळ फुटबॉलच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. या उत्कृष्टता केंद्राच्या व मैदानाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू घडतील, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढेल यासाठी सर्वजण मिळून सातत्याने प्रयत्नशील राहू, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच याच मैदानात लवकरच एएफसी वूमेन एशियन कप इंडिया 2022 चे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *