उत्तर प्रदेशात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका !
उत्तर प्रदेशात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका !
लखनौ. दि. १२ जानेवारी:
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरे काही नवी नाहीत पण उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक तोंडावर भाजपला मोठा झटका बसला आहे. योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेटही घेतली. मौर्य यांच्याबरोबर त्यांचे सहकारी रोशनलाल वर्मा आणि भगवती सागर हे दोन आमदारही समाजवादी पक्षात जाण्याची शक्यता आहे.
योगी सरकारमधील दुसरे मंत्री दारासिंह चौहान हे सुद्धा पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
स्वामी प्रसाद मौर्य हे मौर्य व कुशवाह या ओबीसी समाजाचे प्रमुख नेते मानले जातात. २०१६ मध्ये ते भाजपमध्ये आले त्यापूर्वी ते बहुजन समाज पक्षात होते २०१२ ते १६ या काळात ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. पाचवेळा आमदार झालेले मौर्य बसपचे प्रदेशाध्यक्षही होते. २०१७ मध्ये कुशीनगर जिल्ह्यातील पडरौना विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. स्वामी हे मौर्य समाजाचे नेतृत्व करणाऱ्या उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या तुल्यबळ मानले जातात.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौर्य यांचे मन वळवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे सोपवली आहे. ते इतर असंतुष्ट आमदारांचे मन वळवण्याचाही प्रयत्न करणार आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाजाचे नेते मौर्य यांनी राजीनामा देणे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
