डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण
डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण…
नांदेड, दि. 12 जानेवारी :
वसंतराव नाईक यांनी कृषिक्रांती तर डॉ. शंकरराव चव्हाण यांनी जलक्रांतीसाठी दिलेल्या योगदानाने कोरडवाहू क्षेत्रालाही हक्काचे पाणी मिळू शकले. असंख्य योजना ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे राबविल्या जात आहेत. काळानुरूप या योजनांमध्ये बदल करून त्याला नवतंत्रज्ञानाची जोडही दिली आहे. शेतीसमवेत ग्रामीण भागात शिक्षणाच्या सेवा-सुविधाही अधिक भक्कम होणे गरजेचे असून नव्या काळाशी सुसंगत यात बदल झाले पाहिजेत, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले .
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यात माहूर, हिमायतनगर, किनवट व इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना या भागासाठी राबविल्या जातात. आदिवासी क्षेत्र व बिगर आदिवासी क्षेत्र यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या ग्रामीण पातळीपर्यंत यशस्वीपणे पोहल्या पाहिजेत. याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी निजामकाळातील असलेल्या शाळा मोडकळीस आल्या आहेत. या धोकादायक असलेल्या शाळांच्या इमारती काढून त्याठिकाणी नवीन इमारती उभ्या करण्यावर भर देऊ असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
आपल्या जिल्ह्याचे क्षेत्र मोठे आहे. सर्व भागाच्या समतोल विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून ग्राम विकासात नांदेड जिल्हा मागे राहणार नाही यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी यावर भर देऊन काम करतील, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जलजीवन मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाला शुद्ध व स्वच्छ पाणी पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार आहे. अर्धवट बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित कशा होतील याकडे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी लक्ष दिले पाहिजे. ज्या ठिकाणी नवीन योजना प्रस्तावित केल्या आहेत ती कामे अधिक चांगल्या प्रतीचे झाली पाहिजेत. येत्या दोन वर्षात जलजीवन मिशनमधील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक, नाविन्यपूर्ण पद्धतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने प्रयोगशील शेतकऱ्यांचा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात दत्तात्रय कदम (धामदरी अर्धापूर), बालाजी शामनवाड (नागापूर भोकर), बळवंत पाटील (बोरगाव थडी बिलोली), सदाशिव वाडीकर (खुतमापूर देगलूर), प्रमोद हेमके (करखेली धर्माबाद), कैलास पोगरे (हदगाव), अर्जुन राठोड (बळीराम तांडा हिमायतनगर), गोविंद काळम (उस्माननगर कंधार), पांडुरंग खुपसे (टिंगणवाडी किनवट), अर्जुन जाधव (डेरला लोहा), संजय गायकवाड (हिवळणी माहूर), संजय पवार (निवघा मुदखेड), केशव इंगोले (बेरळी बु मुखेड), कमलबाई अण्णाराव धोतरे (नाळेश्वर नांदेड), नागनाथ हुलकुडे (मांजरमवाडी नायगाव), माधव कदम (शेलगाव उमरी) व बालाजी जाधव (लखमापूर मुखेड) यांचा समावेश आहे. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी भगवानराव इंगळे व धोंडीराम सुपारे यांचाही यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला
