नाना पटोलेंविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करा !
नाना पटोलेंविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करा !
मुंबई, ७ जानेवारी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाबमध्ये झालेल्या गंभीर व धोकादायक गफलतीबाबत तपास चालू असताना देशाच्या गृहमंत्र्यांबद्दल शंका व्यक्त करून तपास प्रभावित केल्याचा व तपासात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
ते म्हणाले की, पटोले यांनी देशाच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्याची सूचना आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या बाबतीत जी घटना घडली ती अत्यंत गंभीर होती. पाकिस्तानच्या सीमेजवळ घडलेल्या या प्रकारामागे पंतप्रधानांच्या हत्येचे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त होत आहे. देशाच्या सुरक्षितेविषयी अत्यंत गंभीर विषयावर आता सर्वोच्च पातळीवर चौकशी सुरू आहे. अशा स्थितीत नाना पटोले यांनी ही घटना नौटंकी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली तसेच त्यांनी या घटनेमागे देशाच्या गृहमंत्र्यांचा हात असल्याचा संशय जाहीरपणे व्यक्त केला. हा तपासावर प्रभाव टाकण्याचा व तपासाची दिशा भरकवटण्याचा प्रयत्न आहे. याचा आपण निषेध करतो आणि पटोले यांच्यावर कारवाईची मागणी करतो. पंतप्रधानांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल त्यांच्याकडे काही माहिती आहे का याचा तपास करावा, अशीही आपली मागणी आहे. देशाच्या सुरक्षिततेविषयी जनतेची दिशाभूल केल्याबद्दल पटोले यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची सूचना आपण भाजपा कायकर्त्यांना दिली आहे.
