महाराणी सईबाई समाधीस्थळ विकासाचा आराखडा तयार करा
महाराणी सईबाई समाधीस्थळ विकासाचा आराखडा तयार करा.
मुंबई, दि. 6 जानेवारी:
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी समाधी असून या समाधी परिसराचा विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या परिसराची पाहणी करावी आणि त्याचा सर्वंकष आराखडा तयार करा असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी दिले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी ससलेल्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा फार मोठा इतिहास लाभला असून हे गडकिल्ले दुर्लक्षित होऊ नयेत त्यासाठी त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. या समाधीस्थळ व परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह जलसंपदा, भूमी अभिलेख, पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी करुन अहवाल सादर करण्याचेही निर्देश सभापतींनी दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचा विकास करण्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर केला जाईल. महाराष्ट्राचा अभिमान,अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. या आराखड्यामध्ये बंधारा आणि त्यावरील घाट विकसित करण्याच्या बाबींचा समावेश करतानाच गुंजवणी नदीच्या उगमाजवळच्या परिसराचे महत्त्व ओळखून त्याचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. समाधीस्थळ परिसराच्या विकासाचे काम हे दोन टप्प्यात करण्यात येईल, पहिल्या टप्प्यात झालेल्या कामांनंतर पुढील टप्प्यांमधील कामे केली जातील असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
