कोरोनामुळे राज्यातील सर्व कॉलेज बंद !
कोरोनामुळे राज्यातील सर्व कॉलेज बंद !
मुंबई, दि. ५ जानेवारी :
कोविड आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/ महाविद्यालयीन परीक्षा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत राज्यातील विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासमवेत कोविड-19 परिस्थितीची आढावा बैठक घेतली होती.
सामंत म्हणाले की, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या. यामध्ये विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिविटी नसल्यामुळे अथवा स्वत: विद्यार्थी किंवा कुटुंबीय कोविडबाधित असल्यास संबंधित विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी. तसेच गोंडवाना विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ व नांदेड विद्यापीठाशी संलग्नित काही भागात नेटवर्किंग सेवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरुपात या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करावे.
परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ /महाविद्यालयाने हेल्पलाईन व्यवस्था सुरु करावी. परीक्षेची कार्यपद्धती, परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच विद्यापीठानी त्यांच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून द्यावी.
सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयाशी संबंधित वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना व कालावधी देऊन ही वसतिगृह बंद करण्यात यावीत. यामध्ये परदेशी विद्यार्थी व संशोधन करीत असलेली पीएचडीचे विद्यार्थी यांना वसतीगृहात राहण्याची परवानगी देण्यात यावी. या विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याबाबत विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. स्थानिक प्राधिकरण कोविड केअर सेंटर म्हणून वसतिगृह आवश्यकता असल्यास ती उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही सामंत यांनी केल्या.
विद्यापीठे तसेच महाविद्यालयानी अद्याप लसीकरण न झालेल्या विद्यार्थी यादी स्थानिक प्राधिकरणना देऊन लसीकरण साठी विशेष मोहीम राबवून तसेच विद्यार्थीया मध्ये जनजागृती करून तातडीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे. तंत्रनिकेतन मधील विद्यार्थी 15 ते 18 या वयोगटातील असल्याने व या वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण सुरू झाले असल्याने संचालक तंत्रशिक्षण यांनी लसीकरण करावयाच्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणाला उपलब्ध करून द्यावी व विशेष मोहिमेद्वारे लसीकरण पूर्ण करून घावेत. तसेच संचालक कला यांनी ऑनलाईन चित्रकला परीक्षेसंदर्भात नियोजन करुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच विद्यापीठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची चक्राकार पद्धतीने 50 टक्के उपस्थितीचे नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही सामंत यांनी केले.
