राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द !

0
NCP 222

राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द !

मुंबई, दि. ५ जानेवारी :

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजित शिबीरे व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नयेत, असा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मंत्री व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी माहिती दिली.

प्रसार माध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील असेही बैठकीत चर्चा झाली.

मंत्री आणि पालकमंत्री व संपर्कमंत्री त्या-त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतील. पक्षातंर्गत होणार्‍या निवडणूकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय आगामी ज्या निवडणूका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केली आहे असेही नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *