पुण्यातील शाळाही ३० जानेवारीपर्यंत बंद !

0
IMG-20210517-WA0053

पुण्यातील शाळाही ३० जानेवारीपर्यंत बंद !

पुणे, दि. ४ जानेवारी :
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईनंतर आता पुण्यातील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील पहिली ते आठवीच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत मात्र ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरूच राहील अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले की, सध्या कोरोना परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. मी बीएमसीचे आयुक्त चहल यांच्याशी देखील बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की मुंबईतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईने ऑफलाईन शाळा पहिली ते आठवीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नववीची शाळा सुरू ठेवली आहे, का तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करणे सोपे जाते. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशीही मी बोललो, त्यांनी सांगितले की याबद्दलचा स्थानिकांना अधिकार दिलेला आहे की तिथली परिस्थिती काय आहे ते पाहून त्यांनी निर्णय घ्यावा. पुणे जिल्ह्यापुरते बोलायचे झाले तर ७४ टक्केच नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतलेला आहे. माझी पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्हाला टोकाचे कुठले तरी पाऊल उचलायला लावू नका.
कॉलेज व इतर निर्बंधांबाबत बुधवारी मुंबईत बैठक घेऊन संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय जाहीर करणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी राज्यातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई, पनवेल महापालिकेनेही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *