क्रांतिज्योती सावित्रीबाईंमुळेच आजच्या महिलांची झेप !
क्रांतिज्योती सावित्रीबाईंमुळेच आजच्या महिलांची झेप !
मुंबई दि. 4 जानेवारी :
भारताच्या इतिहासावर ज्यांची अमीट छाप आहे असे स्त्री रत्न म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय स्त्री ने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते असे मत महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूरयांनीव्यक्त केले.
मंत्री ठाकूर पुढे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कर्मठ समाज व्यवस्थेत स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करण्याचे धाडस दाखवले म्हणूनच आजची स्त्री तेजाने तळपत आहे. सावित्री बाईंची जयंती गेल्या वर्षीपासून महिला व बाल विकास विभागातर्फे सावित्री उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. सावित्री माईंच्या शिकवणीनुसार मी आणि माझा विभाग महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावित्री उत्सव साजरा करताना राज्यातील सर्व अंगणवाड्यांमधे कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले. अंगणवाडी व प्रकल्प स्तरावर प्रतिमा पूजन, अभिवाचन, जनजागृती कार्यक्रम, प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले. १०० टक्के लसीकरण करणार्या व पोषण माह मधे उत्कृष्ठ काम करणार्या बिट मधील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेनुसार एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन करणार्या जोडप्यांचा सत्कार करत गौरवण्यात आले. कोरोना काळात एकल झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत असून आज अनाथ बालकांच्या घरी भेट ही महिला व बाल विकास विभागाच्या अधिकार्यांनी दिली. विविध खेळात देशपातळीवर प्राविण्य प्राप्त केलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला.
नवीन वर्षातला पहिला सण असं ज्याचं वर्णन केलं जात त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्री उत्सव म्हणून महिला व बाल विकास विभागाच्या राज्यभरातील सर्व कार्यालय व अंगणवाड्यांमधे कोविड प्रतिबंधात्मर नियम पाळत उत्साहात साजरी करण्यात आली.
