कोरोनामुळे मुंबईत पहिली ते आठवीचे वर्ग बंद
कोरोनामुळे मुंबईत पहिली ते आठवीचे वर्ग बंद.
मुंबई, दि. ३ जानेवारी:
कोरोनामुळे दीड वर्ष बंद असलेल्या शाला सुरु करून महिनाच लोटला असताना आता पुन्हा एकदा मुंबईतल्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. १५ डिसेंबर रोजीच पहिली ते आठवीच्या शाळा सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकीने शाळांबाबत अखेर निर्णय घेतला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शाळा या सुरु राहणार आहेत.
राज्यातील शाळाबाबतही दोन दिवसातच निर्णय होण्याची शक्यता आहे तर कॉलेज सुरू ठेवायचे की ऑनलाइन पद्धतीने चालवायचे याबाबतचा निर्णयही दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती पाहून घेऊ असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
