महसूल विभाग शासन व प्रशासनाचा कणा!
नाशिक येथे आगळावेगळा ऑनलाईन महसूलदिन साजरा; महसूलमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री, कृषिमंत्री यांची कौतुकाची थाप
नाशिक दि. 4 ऑगस्ट, 2020
महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा आहे. या महसूल वर्षात ‘आठ अ’ हा ऑनलाईन उतारा देण्याची सुविधादेखील सुरू करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ऑनलाईन महसूल दिन कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री थोरात, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुकाची थाप दिली. यासोबत नाशिक विभागातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा सत्कार करून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नाशिक विभागात तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील सर्व जिल्हे व तालुक्यातील कोतवालांपासून ते अपर जिल्हाधिकारी असे सर्व साधारण अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार सर्व मंत्री महोदयांनी महसूल विभागाला कौतुकाची थाप दिली .
लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचविणारा विभाग : महसूलमंत्री थोरात
शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम महसूल विभाग करीत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक विभाग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साजरा करत असलेला ऑनलाईन महसूल दिनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कोविडच्या काळात महसूल विभाग आपली भूमिका कार्यक्षमपणे पार पाडत असून राज्याचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो असेही थोरात यांनी सांगितले.
ऑनलाईन महसूल दिन ही आपत्तीकाळातील इष्टापत्ती आहे : पालकमंत्री भुजबळ
1 ऑगस्टपासून नवीन महसूल वर्षाला सुरूवात होत असते. या महसूल दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजस्व अभियानाचा देखील शुभारंभ करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण यावर्षी महसूल दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरा करीत आहोत. यामुळे कोरोना आपत्तीच्या काळामधील ही एक इष्टापत्ती आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाशिक विभागातील साधारण 2 हजार 500 अधिकारी कर्मचारी एकत्र येण्यास मदत झाली आहे. महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे, हे या विभागाने जमा केलेल्या महसूलातून सिद्ध होत केले आहे, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
महसूल विभागाचे काम हे 24 तास व 365 दिवस अविरतपणे सुरू असलेले आहे. कोणतीही परिस्थिती असो महसूल विभागाची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची असते. याअनुषंगाने केलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन शाबासकीची थाप मिळणे आवश्यक आहे, त्यामुळे काम करताना सकारात्मक उर्जा ही प्रत्येकाला मिळत असते. तंत्रज्ञानामुळे कामाच्या गतीसोबतच त्याचे स्वरूप देखील बदलले आहे. कोविडच्या या परिस्थितीत राज्याचे अर्थचक्र सुरळीतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी ही देखील महसूल विभागाची असल्याने येणाऱ्या काळातही या विभागामार्फत तत्परतेने काम होईल. तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण झाले तर राज्य आणि देश स्वयंपूर्ण होईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून न्याय मिळावा : कृषिमंत्री दादाजी भुसे
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, महसूल विभाग हा सर्व विभागांचे प्रतिनिधीत्व करीत असून इतर विभागांवर याविभागाचे नियंत्रण असते. येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून न्याय देण्यात यावा. त्याचप्रमाणे महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी ठराविक कालावधीचे वेळापत्रक असावे, अशी अपेक्षा कृषिमंत्री भुसे यांनी व्यक्त केली.
विभागीय आयुक्त माने म्हणाले, महसूल विभागाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या महसूलाचे प्रमाण वाढले असून संगणकीकरणामुळे खटल्यांचे व तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच शेतीच्या अनुषंगाने ई पीक पाहणी हा नवीन प्रयोग दिंडोरी तालुक्यातून सुरू करण्यात आला आहे. कामाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारे असावेत, यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत, असे माने यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार यांनी महसूल दिनानिमित्त पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
लोकांच्या दृष्टीने तसेच प्रशासनात काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक विषयांचे एकत्रीकरण असलेल्या महत्वाकांक्षी महाराजस्व अभियानाचे औपचारिक उद्घाटनदेखील करण्यात आले. तसेच उपविभागीय अधिकारी, दिंडोरी डॉ. संदिप आहेर, नाशिक तहसिलदार अनिल दौंडे, नायब तहसिलदार डॉ. स्वप्निल सोनवणे, अव्वल कारकून श्रीमती एम.एस. काथेपुरी, लिपीक स्मिता छत्रे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक राजेंद्र काळे यांचे प्रातिनिधीक स्वरूपात प्रातिनिधीक स्वरूपात यावेळी सत्कार करण्यात आले. उपायुक्त दिलीप स्वामी यांनी या कार्यक्रमाच्या निमीत्ताने प्रत्यक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंत्री, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.
