ओमायक्रॉन विषाणुमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध !

0
KKK 33

ओमायक्रॉन विषाणुमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध !

लग्नास ५० जण तर अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी.

मुंबई, दि. ३१ डिसेंबर :

ओमायक्रॉनच्या संकटामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्न सोहळय़ांबरोबरच कोणत्याही समारंभासाठी ५० जणांनाच परवानगी देँण्यात आली आहे.अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत केवळ २० लोकांनाच परवानगी असणार आहे. रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरे किंवा पर्यटनस्थळ, चौपाटय़ा किंवा समुद्र किनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेत सर्व चौपाटय़ा बंद असणार आहेत.

राज्यात दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चौपाटय़ा, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने चौपाटय़ा, समुद्रकिनारे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाची लाट रोखण्यासाठी अधिक कठोर निर्बंध किंवा टाळेबंदीचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत. मात्र टाळेबंदी करताना शहर किंवा जिल्हयातील उपलब्ध खाटा आणि प्राणवायूची गरज याचा विचार करून टाळेबंदीचा निर्णय घेतला जाईल.

मुंबई, ठाणे, पुण्यात कोरोनाचा अधिक उद्रेक झाला आहे. मुंबईतील बाधितांचे प्रमाण ८.४८ टक्के असून ठाण्यात ५.२५ तर पुण्यात ४.१४ असे आहे. रुग्णसंख्या वाढीचा दर असाच राहिल्यास निर्बंघ अधिक कठोर करावे लागतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *