ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांना भाजप देणार पुरस्कार !
ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांना भाजप देणार पुरस्कार !
मुंबई, दि २९ डिसेंबर:
देशभर महाराष्ट्राचे नाव गाजविणाऱ्या सरकारच्या या कर्तबगारीची योग्य ती दखल घेऊन त्यासाठी जबाबदार असलेल्यांचा उचित सन्मान करण्याचे भाजपने ठरविले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी सरकारमधील घोटाळेबाज मानकऱ्यांना घोटाळेरत्न, घोटाळेभूषण, घोटाळेवैभव आणि घोटाळेसम्राट असे पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
उपाध्ये म्हणाले की, गेल्या वर्षभरात आरोग्य खात्यातील परीक्षा घोटाळे गाजले. हजारो उमेदवारांचे अतोनात हाल करून उमेदवारांचे भवितव्य अंधारात ढकलण्याची कर्तबगारी दाखविल्याबद्दल राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना या सत्कार मालिकेतील पहिला मानाचा ‘घोटाळेरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार या मोहिमेअंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे. पक्षातर्फे राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी हा पुरस्कार समारंभपूर्वक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देण्यात येऊन घोटाळ्यांचा नवा आविष्कार दाखविल्याबद्दल टोपे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास घोटाळेरत्न पुरस्काराचे पदक प्रदान करण्यात येईल.
आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांचा अभूतपूर्व गोंधळ घालून उमेदवारांच्या मनस्तापास कारणीभूत ठरल्याबद्दल राजेश टोपे यांनी एकदा उमेदवारांची माफीदेखील मागितली होती. घोटाळे करून त्यावर माफी मागण्याचा मोठेपणा दाखविणारे टोपे हे ठाकरे सरकारमधील एकमेव मंत्री असल्याने, ते या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
अनिल देशमुख यांनाही हा पुरस्कार देण्याचा भाजपचा मनोदय होता पण त्याआधीच त्यांना मंत्रिपदावरून जावे लागल्याने ते या सर्वोच्च पुरस्कारास मुकले आहेत. त्यांचा योग्य ठिकाणी योग्य तो सन्मान व्हावा अशी भाजपची मागणी आहे, असे उपाध्ये म्हणाले.
राजेश टोपे यांच्या आरोग्य खात्याप्रमाणेच अन्य अनेक खात्यांतील घोटाळेही उघडकीस येत असल्याने अशा खातेप्रमुख मंत्र्यांनाही विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. घोटाळ्यांच्या मालिकेतील सर्वोच्च मानाचा असा ‘जीवन गौरव पुरस्कार’ही या पुरस्कार मालिकेत प्रदान करण्यात येणार असून त्याचा मानकरी निवडण्याकरिता लवकरच जनतेचा कौल घेण्याची राज्यव्यापी मोहीम हाती घेण्यात येणार आहे असे उपाध्ये म्हणाले.
