भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय आता मुंबईत !
भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय आता मुंबईत !
नवी दिल्ली, दि. 18 डिसेंबर:
बेळगावसह प्रयागराज व कोलकाता पाठोपाठ आता लवकरच चेन्नई येथील केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय अपुऱ्या मनुष्यबळामुळे बंद करण्यात येणार आहे. बेळगाव येथून चेन्नईला हलविलेले पश्चिम विभागीय कार्यालय महाराष्ट्र सरकारने जागा दिल्यास आपण मुंबई येथे सुरू करू, असे ठोस आश्वासन केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोग खात्याचे मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी दिले आहे.
मुक्तार अब्बास नक्वी यांच्या भेटीसंदर्भात माहिती देताना शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, देशामध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशी प्रांतरचना झाली. त्यानुसार भाषिक अल्पसंख्यांक आयोगाची कार्यालये स्थापण्यात आली. पश्चिम विभागीय कार्यालय म्हणून पूर्वी मुंबईला असलेले कार्यालय बेळगावला नेण्यात आले होते. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात 1976 च्या दरम्यान मुंबई येथे असलेले हे कार्यालय बेळगावला हलविण्यात आले. कारण तेथील प्रश्न जास्त महत्त्वाचा झाला होता. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दादरा -नगर हवेली असा पश्चिम भाग केला गेला. त्याचे कार्यालय बेळगावला होते. सध्या सर्वात गंभीर प्रश्न बेळगावचा आहे. कारण तेथील मराठी माणूस हा कर्नाटकात अल्पसंख्यांक आहे. त्यांच्यासाठी ते कार्यालय सोयीचे होते. त्या कार्यालयाकडून गेलेले अहवाल महाराष्ट्राच्या दृष्टीने सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सोयीचे ठरले होते. मात्र केंद्र सरकारने संबंधित कार्यालय चेन्नई येथे हलविले आहे. त्यामुळे बेळगाव सीमा भागातील लोकांची होणारी गैरसोय, त्यांना होणारा त्रास आम्ही मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांच्या निदर्शनास आणून दिला.
नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील शिवसेना खासदारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय पूर्ववत बेळगाव येथे सुरू करावे अशी मागणी करण्यासाठी मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांची भेट घेतली असता त्यांनी उपरोक्त आश्वासन दिले. तत्पूर्वी खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदाराच्या शिष्टमंडळाने सदर कार्यालयासंदर्भात मंत्री नक्वी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी चेन्नई येथील कार्यालय सीमा भागातील लोकांसाठी किती अडचणीचे आणि त्रासदायक ठरत आहे हे नक्वी यांना पटवून देण्यात आले. तसेच ते कार्यालय कसे परत आणता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी अपुऱ्या मनुष्यबळामुळे बेळगावसह प्रयागराज व कोलकता येथील भाषिक अल्पसंख्यांक आयोगाची कार्यालय बंद करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच आता लवकरच चेन्नई येथील कार्यालय देखील बंद केले जाणार असल्याची माहिती दिली. त्यावर शिवसेना खासदारांनी बेळगावसह सीमाभागासाठी सदर कार्यालयाची किती गरज आहे हे पटवून दिल्यानंतर केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे पश्चिम विभागीय कार्यालय मुंबईत सुरू करण्याचे मंत्री नक्वी यांनी मान्य केले. मात्र त्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले.
