कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही !

0
Nitin Raut 333

कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही !

औरंगाबाद, दि. १७ डिसेंबर:

महावितरण कर्ज घेऊन पैसे भरते मग ग्राहकाला वीज कशी फुकट देऊ? असा सवाल करत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणालाही फुकटात वीज मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे.

नितीन राऊत म्हणाले की, महावितरण वीज फुकटात विकत घेत नाही किंवा त्यांना कुणी फुकटात वीज देत नाही. वीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांना कोळसा घ्यावा लागतो. त्यांना बँकांचे कर्ज घ्यावे लागते, त्यांना पैसा द्यावा लागतो. महावितरणकडे पैसेच राहिले नाही तर महावितरण बंद होऊन जाईल. राज्यात महावितरणने काम केले नाही तर या ठिकाणी खासगी कंपन्या उतरतील. तुम्हाला खासगी कंपन्या उतरवायच्या असतील तर उतरवा. मला त्याचे काहीही नाही. राज्याचा उर्जामंत्री या नात्याने मी एवढंच सांगेल की शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची मला जाण आहे आणि वीज ग्राहकांच्या प्रश्नांचीही मला जाण आहे.

कोळशाच्या अभावी संपूर्ण देशात वीज बंद पडली, लोड शेडिंग झाले तेव्हा मी आपल्या राज्यात तसे होऊ दिले नाही. कोरोना, लॉकडाऊनच्या काळात २४ तास लाईट दिली. महापूर, अतिवृष्टी झाली त्यावेळीही लवकर धावत जाऊन वीज जोडणी पूर्ववत केली असेही नितीन राऊत यांनी नमूद केले. सतत वाढत असलेल्या थकबाकीमुळे महावितरणवर ५७ हजार कोटी रूपयांचे कर्ज झाले आहे. कर्जाचे हप्ते, व्याज, विकत घेतलेल्या विजेचे पैसे दिले तरच वीज विकत घेवून वीज पुरवठा करणे शक्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी चालू दोन वीज बिले भरून सहकार्य करावे असे आवाहन डॉ. नितिन राऊत यांनी केले.

राऊत पुढे म्हणाले की, महावितरण कंपनी महानिर्मिती कंपन्यांसह इतर खाजगी कंपन्यांकडून करार पध्दतीने वीज विकत घेते. या विकत घेतलेल्या विजेचे दरमहा पैसे अदा करावे लागतात. बॅंकांच्या कर्जाचे हप्ते व व्याज, केंद्राकडून पॉवर एक्सचेंजमधून घेतलेल्या विजेचे पैसे, रोहित्र दुरूस्तीसाठी नेमलेल्या एजन्सींचे पैसे दयावे लागतात, अन्यथा वीज मिळणार नाही. शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत देण्यासाठी कृषी धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कंपनी आर्थिकदृष्टया टिकली तरच सर्वस्तरातील वीज ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणे शक्य होईल असे राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *