गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’सारखी योजना राबविण्याचा मानस
गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’सारखी योजना राबविण्याचा मानस..
कोल्हापूर, दि. 13 कोल्हापूर :
ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग सदैव तत्परतेने काम करीत आहे. यापुढे पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले .
हातकणंगले येथे बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागाचा विकास करणे, या भागातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा ग्रामविकास विभागाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ग्रामविकास विभागामार्फत अनेक नवनवीन योजना राबविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. गावात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सरपंचानी ग्राम विकसाच्या योजना उत्तमरितीने राबविण्यासाठी पुढे यावे. गावातील रस्ते, आरोग्य सुविधा, प्राथमिक शाळा, अंगणवाडी यासारख्या कामांना प्राधान्य द्यावे. विकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही याची ग्याही त्यांनी दिली.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे राज्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाली. याचा परिणाम विकास कामांवरही झाला. मात्र अशा परिस्थितीही शासन सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आरोग्याबरोबच विकास कामांनाही निधी उपलबध करुन देण्याचा प्रयत्न केला असल्याचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. कोरोना काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि सदस्यांनी चांगले काम केल्यामुळेच पहिल्या व दुसऱ्या लाटेला थोपवू शकलो. आता संभाव्य तिसऱ्या लाटेलाही आपणास थोपवावयाचे आहे. यासाठी प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पंचायत समिती हातकणंगलेची नुतन इमारत चांगली आहे. या इमारतीमधून लोकाभिमुख योजना राबवून सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे. इमारतीचा परिसर स्वच्छ व सुंदर करणे आवश्यक आहे. परिसराच्या स्वच्छतेसाठी ग्रामविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना उत्पन्नाचे साधन निर्माण होण्यासाठी त्यांच्या ताब्यात असलेल्या रिकाम्या जागा विकसित करण्यास जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा,अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
