शरद पवार इनस्पायर फेलोशीपमध्ये गुणवंतांचा सन्मान
कर्तृत्ववान नव्या पिढीला सन्मानित करण्याची संधी मिळेल
शरद पवार इनस्पायर फेलोशीपमध्ये गुणवंतांचा सन्मान.
मुंबई, दि. ११ डिसेंबर :
जवाहरलाल नेहरू हे आधुनिकता, वैज्ञानिकता, साहित्य या सगळ्यांचे पुरस्कर्ते होते. या गोष्टींना त्यांनी सातत्याने प्रोत्साहित केले होते. त्यांच्या नावाने चालणार्या संस्थेमधून या उपक्रमाची सुरुवात होतेय त्यामुळे हे काम इथे थांबणार नाही. या कामाच्या पाठी जी टीम आहे ती वाहून घेणारी आहे त्यामुळे दरवर्षी नाविन्यपूर्ण, कर्तृत्ववान नव्या पिढीची माहिती घेऊन त्यांना सन्मानित करण्याची संधी मिळेल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई’ यांच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ पुरस्काराचे वितरण नेहरू सेंटर वरळी येथे पार पडले. या फेलोशिपमध्ये कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० फेलोंचा समावेश आहे.
या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्वांचे आभार मानले. शिवाय सहकार्य करणार्यांना धन्यवाद दिले तर फेलोशीप मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. यावर्षी फेलोशीप मिळू न शकलेल्या उमेदवारांनी निराश न होता पुढच्यावर्षी पुन्हा प्रयत्न करावा, आपणास नक्की यामध्ये यश मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
शरद पवार यांच्या प्रदिर्घ कारकिर्दीला सलाम करण्यासाठी कृषी, साहित्य आणि शिक्षण या तीन क्षेत्रांसाठी अनुक्रमे ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’, ‘शरदचंद्र पवार साहित्य फेलोशीप’ आणि ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन्’ या तीन फेलोशीपची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत या तिन्ही क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषी व साहित्य क्षेत्रातील फेलोशीपसाठी ८ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यभरातून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत शेकडो प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावांवर विचार करुन त्या – त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निवडसमितीने ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८० तर ‘शरदचंद्र पवार साहित्य फेलोशीप’ साठी १० अशा एकूण ९० फेलोंची निवड केली.
कृषी क्षेत्रातील फेलोशीपसाठी प्रत्येकी ४० अशा दोन बॅचेस केल्या जाणार असून पहिल्या बॅचचे प्रशिक्षण दिनांक १२ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात येणार आहे. तर दुसरी बॅच २ मे २०२२ पासून सुरु करण्यात येईल. ‘शरदचंद्र पवार साहित्य फेलोशीप’ दिनांक १२ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली.
या दोन्ही फेलोशीप शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व फेलोशीपचे तज्ज्ञ सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रातील ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन’ साठी १ जानेवारी २०२२ पासून प्रस्ताव सादर करता येणार असून या सर्व फेलोशीपसाठी पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामती आणि एमकेसीएल फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार आहे.
यावेळी ज्येष्ठ वैज्ञानिक अनिल काकोडकर, विवेक सावंत, प्रो. नलावडे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, प्रा. हरी नरके, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, सुधींद्र कुलकर्णी, पत्रकार अनंत बागाईतकर, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले आदींसह पक्षाचे आमदार, खासदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
ज्यांना ही फेलोशिप मिळाली त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी फेलोशिप मिळालेल्यांनी आपले विचार मांडले. फेलोशीपचे तज्ज्ञ सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. अनिल काकोडकर यांनी फेलोशिपचे महत्त्व आणि त्यामागची भावना व्यक्त केली.
