राम मंदिरासाठी नरेंद्र मोदींचे योगदान काय?
खरे श्रेय तर राजीव गांधी, नरसिंहराव व अशोक सिंघल यांचेच!
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा मोदींना घरचा आहेर!
मुंबई, दि. 3 ऑगस्ट
अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सूरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे. नरेंद्र मोदींमुळेच राममंदिराचा मार्ग मोकळा झाला असून त्याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदींना देण्यात काही मीडीया व समर्थक कामाला लागले आहेत. परंतु राम मंदिराचं स्वप्न साकार होत असलं तरी त्याचे श्रेय मोदी यांचे कदापी नाही, राम मंदिर प्रश्नी त्यांचे काडीचेही योगदान नाही, असे भाजपचेच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.
राम मंदिराचे स्वप्न साकारत असताना त्याचे खरे श्रेय हे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी व पी. व्ही. नरसिंहराव व राम मंदिरासाठी आयुष्यभर लढा दिलेल्या विहिंपच्या अशोक सिंघल यांचे आहे.
राजीव गांधी यांनीच राम मंदिराचे कुलुप उघडायचा निर्णय घेतला व त्यांनीच शिलान्यास करण्याची परवानगीही दिली. राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान झाले असते तर तेव्हाच राम मंदिरही साकारले असते पण त्यांचे दुर्दैवी निधन झाले, असे स्वामी म्हणाले.
राम मंदिरासाठी माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी सुद्धा काहीही केलेले नाही असे सांगतानाच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलावर सहा वर्षांपासून राम सेतूची फाईल पडून आहे परंतु ते त्यावर सही करत नाहीत याचे दुःख वाटते अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
राम मंदिर भूमिपूजनासाठी पुढे होऊन श्रेय घेणा-या नरेंद्र मोदी व इतरांना स्वामी यांनी आरसा दाखवलेला आहे.
