आशिष शेलार अडचणीत; अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल !

0
IMG-20211128-WA0031

आशिष शेलार अडचणीत; अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल !

मुंबई, दि. 9 डिसेंबर:
महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी अपशब्द वापरल्या मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
ठाकरे सरकार खोटे गुन्हे दाखल करुन जर घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल तर यापुढे अजून जोरात प्रश्न मांडेन. विरोधीपक्षाचा आमदार म्हणून मुंबईकरांचे प्रश्न मांडणे हा जर गुन्हा असेल तर मग तो शंभरवेळा आम्ही करु असे आ. आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

शेलार म्हणाले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही मांडला म्हणून विधानसभेतून निलंबित केले गेले. महापालिका यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे दुर्दैवाने मृत्यू झालेल्या वरळीतील चिमुरड्याच्या मृत्यूचा जाब सत्ताधीशांच्या विचारला, कोष्टल रोड मधील भ्रष्टाचार उघड केला, ममता बॅनर्जी सोबतच्या बैठकीतील ठाकरे सरकारचा महाराष्ट्र विरोधातील छुपा अजेंडा उघड केला म्हणून खोटा गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचे काम केले जात आहे.

मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन. महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, तसा आमचा संस्कारही नाही. महापौर किशोरी पेडणेकर यांचा आणि माझा गेले अनेकवर्षांचा स्नेह असून आम्ही नगरसेवक म्हणून एकत्र काम केले आहे. महापालिका सभागृहात मुंबईकरांच्या विषयावर अनेक वेळा कडवा संघर्षही झाला, पण कटूता, अपमान असे कधी घडले नाही. त्यामुळे आता त्यांच्याबाबत जे खोटे चित्र उभे केले जातेय ते त्यांनाही पटणार नाही, अशी माझी धारणा आहे. या मागचा बोलविता धनी कोण? याची कल्पना मला आहे.

ज्या पत्रकार परिषदेवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ आजही युट्युबवर उपलब्ध आहे. त्यातील सत्य, जे सत्ताधारी पक्षाला बघायचे नसले तरी ते न्यायालयासमोर आम्ही मांडू. माझा न्याय व्यवसस्थेवर विश्वास आहे. सत्य समोर येईलच.

माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आंदोलन सोडून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तो खोट्या कुटनितीवर असल्याने या असत्य आणि खोट्याच्या विरोधात संघर्ष करायला डगमगणार नाही, अशा असनदशीर दमदाटीला, दडपशाहीला घाबरणार नाही, आणि जनसेवेचा घेतला वसा टाकणार नाही, असे शेलार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *