कष्टकरी, शेतक-यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे

0
20211206_141755

कष्टकरी, शेतक-यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे

नाशिक, खेडगाव, दि. ६ डिसेंबर :
देशातील बहुसंख्य घटक कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले.

खेडगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या नूतन इमारतीचा उदघाटन व ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. त्यावेळी बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, देशाला फक्त घटनाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले, शाहू महाराज यांनी या अगोदरच शेतकरी, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. यामुळे आपण त्यांचे नाव घेत आहोत. शाहू-फुले-आंबडेकर यांनी विज्ञानावर आधारित समाजकारण केले. नाशिकमध्ये आल्यावर मला आनंद होतो की इथे शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहे. इथले तरूण शेतीत नवीन प्रयोग करत असतात याचा आनंद आहे. अडचणी खूप आहेत, सत्ता येते सत्ता जाते मात्र आपण बांधिलकी ठेवली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

श्रीराम शेटे आणि नरहरी झिरवाळ यांचा सत्कार आणि नवीन वस्तूच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत. सत्ता, मिळालेला अधिकार याचा कधीही परिणाम न होऊ देणारे असे श्रीराम शेटे आहेत. मधल्या काळात साखर कारखान्याबाबत नाशिकचं चित्र फारस चांगलं नव्हतं. मात्र श्रीराम शेटे यांनी या भागात पुढाकार घेऊन कामाची सुरुवात केली आणि आज नाशिकची परिस्थिती बदलते आहे. विविध प्रयोग यानिमित्ताने श्रीराम शेटे करत असतात, विजेची निर्मिती सुद्धा आपण करू शकतो. हे आपण सिद्ध केले आहे. राज्यातील १६० सहकारी कारखान्यांचा एक संघ आहे आणि त्या संघात दोन महत्वाचे लोक असतात त्यात एक अध्यक्ष आणि दुसरे उपाध्यक्ष हे उपाध्यक्ष पद सर्व साखर करखाण्याच्या लोकांनी श्रीराम शेटे यांच्याकडे दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *