डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य छपाईला गती द्या!

0
ambedkar 123

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य छपाईला गती द्या!

मुंबई, दि. ४ डिसेंबर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य छपाईमधील गतिरोधाची बाब लक्षात येताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन बाबासाहेबांच्या साहित्य छपाईला गती देण्याची मागणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य हे केवळ दलितांसाठीच किंवा आंबेडकरी विचारधारेसाठीच नव्हे तर सर्वसमावेशक उपयुक्त आहेत. नव्या पिढीसाठी हे साहित्य अत्यंत आवश्यक आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दलित हिताची धोरणे राज्यातही राबविली जावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य जनसामान्यांना अभ्यास, वाचनासाठी उपलब्ध व्हावे यासाठी या साहित्य प्रकाशनासंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी मोठा पुढाकार घेतला होता. २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे खंड-१८ भाग १, भाग २ आणि भाग ३ यांच्या मुद्रण व प्रकाशनासाठी मोठा पुढाकार घेत तीनही खंडांच्या सुमारे १३ हजार अंकांची छपाई करून त्याचे वितरण सुद्धा केले. काही ग्रंथांच्या ५० हजार प्रती छापून त्याचे वितरणही झाले. त्यानंतरच्या काळात २० हजार अंकांची छपाई सुद्धा झाली नाही. बाबासाहेबांच्या विविध अंकांची प्रचंड मागणी असताना छपाई अभावी विद्यार्थी, वाचक, अभ्यासकांना खोळंबून रहावे लागत आहे. बाबासाहेबांच्या भाषणांच्या तीन खंडांसह ‘बुद्धा अँड हिज धम्मा’, पाली ग्रामर अँड पाली डिक्शनरी’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अँड हिज इगॅलीटेरियन मुव्हमेंट’ या व अशा ९ खंडांच्या प्रत्येकी १ लाख म्हणजे एकूण ९ लाख प्रतींची छपाई करण्याचे आदेश दिले. यासाठी २०१७ मध्ये त्यांनी यासाठी निधी उपलब्ध करून देत त्यासाठी कागदाचाही पुरवठा केला. मुंबई, पुणे व नागपूर येथील शासकीय मुद्रणालयांमधून छापण्यात येणा-या ९ लाख साहित्य प्रतींसाठी ५ कोटी ४५ लक्ष ४४ हजार ६७२ रुपये किंमतीचा ६१९ मेट्रिक टन कागद खरेदी करण्यात आला.

केवळ मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीच्या अभावाने साहित्य छपाईचे काम रखडत गेले. ९ लाख प्रतींच्या छपाईच्या बदल्यात केवळ ३३ हजार प्रतींचीच छपाई झाली व त्यापैकी केवळ ३ हजार ६७५ प्रतीच नागरिकांसाठी उपलब्ध झाल्या ही बाब निराशाजनक आहे.

महापरिनिर्वाण दिनापर्यंत बाबासाहेबांच्या साहित्यांच्या छपाई संदर्भातील अडथळे, त्रुटी दूर करून शासनाने योग्य व सकारात्मक निर्णय घेतल्यास बाबासाहेबांना खरी आदरांजली व्यक्त होउ शकेल. त्यादृष्टीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने साहित्य प्रकाशनामध्ये येत असलेल्या मनुष्यबळाचा अभाव आणि यंत्रसामुग्रीची अडचण तात्काळ प्रभावाने दूर करून या सर्व ग्रंथसंपदेच्या छपाईचा मार्ग मोकळा करून लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेपर्यंत वितरीत व्हावे याची व्यवस्था करण्याचीही मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *