पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरु होणार ?
पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरु होणार ?
मुंबई, दि. २४ नोव्हेंबर
कोरोनामुळे मागील दिड वर्षांपासून शाळा बंद असून शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. कोरोनाचा जोर आता ओसरला असल्यामुळे काही वर्ग सुरु करण्यात आले आणि आता इतर वर्ग ही सुरु करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे म्हणतात, चाईल्ड टास्क फोर्सने स्पष्टपणे सांगितले आहे की पहिली ते चौथी विद्यार्थ्यांच्या वयोगटामार्फत विषाणू परसरण्याची शक्यता आहे. मात्र १२ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थामध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सर्व अटीशर्थींसह सुरु करण्याची परवानगी देण्याची सूचना चाईल्ड टास्क फोर्सने केली आहे. याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल.
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग आधीच सुरू करण्यात आले आहेत. आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागात तर शिक्षक, शाळाचालक, पालक अशी सर्वच मंडळी त्यासाठी आग्रही आहेत.
